जालन्यात प्रवेशबंदी झुगारून ट्रक सुसाट; दुचाकीवरील मायलेकास उडवले, आईचा जागीच मृत्यू
By विजय मुंडे | Published: February 17, 2023 02:08 PM2023-02-17T14:08:54+5:302023-02-17T14:09:20+5:30
प्रशासकीय अनास्थेचा जालन्यात बळी; महिलेचा मृत्यू, सुदैवाने वाचले युवकाचे प्राण
जालना : ट्रकने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सुदैवाने अपघातातून बचावला. ही घटना शुक्रवारी सकाळी शहरातील लक्कडकोट भागात घडली. विशेष म्हणजे दिवसा असलेल्या प्रवेशबंदीला झुगारून अनेक मालवाहू वाहने शहरात येत आहेत. प्रशासकीय पातळीवरून अशा वाहनांवर धडक कारवाई करण्याबाबत अनास्था दाखविल्याने त्या महिलेचा बळी गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.
उषा योगानंद पवार (६७ रा. औरंगाबाद) असे मयत महिलेचे नाव आहे. आनंद पवार व त्यांची आई उषा पवार हे दोघे जालना येथील नातेवाईकांच्या घरी असलेल्या कार्यक्रमासाठी आले होते. ते दोघे शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२१- बी.ई.३९४२) जुना जालना भागातील नातेवाईकांच्या घराकडे जात होते. लक्कडकोट भागात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या ट्रकने (क्र.एम.एच.२१- एक्स. ५२२०) जोराची धडक दिली.
या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या उषा पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद पवार हे जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढून पोलीस ठाणे गाठले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत संताप व्यक्त करीत पोलीस प्रशासन कारवाई करीत नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मयत महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.