राजूर येथील ४८ अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:55 AM2019-11-22T00:55:03+5:302019-11-22T00:55:31+5:30
गुरूवारी ४८ अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : येथील ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याबाबत दिलेली मुदत संपल्यानंतर गुरूवारी ४८ अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला. पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.
श्री क्षेत्र राजूर येथील राजुरेश्वर मंदिर परिसर विकास कामांसाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीतून विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात व्यापारी संकुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मंदिर परिसरातील गट नं. १५४ मधील गायरान जमिनीवरील जागेवर अनेक वर्षांपासून दुकानदारांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटलेला आहे. अतिक्रमीत जागेवर रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
त्यामुळे अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविणे गरजेचे होते. त्यानुसार तहसीलदार संतोष गोरड यांनी ग्रामपंचायतीला पत्र देत संबंधित अतीक्रमण हटविण्याबाबत सूचित केले होते. ग्रामपंचायतीने ४८ अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन १९ नोव्हेंबरची मुदत दिली होती. मात्र, नोटिसीची दखल व्यावसायिकांनी घेतली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने गुरूवारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविली. यावेळी काहींनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अनेक दुकाने जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. त्यामुळे मंदिराकडे जाणा-या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
यावेळी नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक एम.एन.शेळके, मंडळाधिकारी पी.जे.काळे, तलाठी अण्णासाहेब कड, शंकर काटकर, शिवाजी देशमुख, राजू उनगे, पवन सुंदर्डे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.