युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Published: October 25, 2023 11:48 AM2023-10-25T11:48:13+5:302023-10-25T11:52:12+5:30

आजपासून पुन्हा आमरण उपोषण; अन्न-पाण्याचा त्याग, उपचारही घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Deliberately misleading the Maratha community, the government is responsible for youth suicides: Manoj Jarange | युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे

युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे

अंतरवाली सराटी (जि.जालना) : सरकारने ४१ दिवसानंतरही मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. यामुळे सरकार मराठा समाजाची जाणूनबुजून दिशाभूल करतेय असा अर्थ होत असल्याची टिका अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली. युवकांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार असून, आरक्षण दिले असते तर युवकांच्या आत्महत्या झाल्या नसत्या असतेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शासनाला दिलेल्या ४० दिवसांची मुदत संपली आहे. यामुळे ४१ व्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाचे रूपांतर पुन्हा आमरण उपोषणात केले आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांनी सांगितल्यानुसार आम्ही ४० दिवसांचा वेळ शासनाला दिला होता. परंतु, ४१ दिवसानंतरही आरक्षण जाहीर झालेले नाही. दोन दिवसांत गुन्हे मागे घेणे असो किंवा सभेवेळी झालेले शेतकऱ्यांचे नुकसान असो त्यावरही शासनाने निर्णय घेतलेला नाही. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. एकूणच आजवर एकाही आश्वासनाची पूर्तता शासनाकडून झालेली नाही. यामुळे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जात आहे. या उपोषणात आपण अन्न-पाण्याचा त्याग करणार असून, उपचारही घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

आत्महत्या करू नका
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे, यासाठी आपला लढा सुरू आहे. परंतु, आत्महत्या होत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तसेच नेतेमंडळींना गावबंदी करा, कायदा हातात घेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Deliberately misleading the Maratha community, the government is responsible for youth suicides: Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.