मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 01:15 PM2023-09-06T13:15:41+5:302023-09-06T13:16:25+5:30
काही समाज कंटकांकडून मनोज जरांगे यांच्या जीवितीला धोका निर्माण होऊ शकतो.
- पवन पवार
वडीगोद्री (जि.जालना) :मराठा आरक्षणासाठी मागील नऊ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या जिवाला धोका असून, त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत मराठा समाज महाराष्ट्रच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गेल्या नऊ दिवसांपासून राज्यातील सर्व नेते मंडळी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची भेट घेऊन गेले. लाठी हल्ल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून, संपूर्ण राज्यातील मराठा समाज पेटून उठला आहे. या परिस्थितीमुळे समाजातील काही समाज कंटकांकडून मनोज जरांगे यांच्या जीवितीला धोका निर्माण होऊ शकतो. काही अनुचित प्रकार घडला तर महाराष्ट्रातील मराठा समाज चवताळून उठेल व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
या घटनेमुळे महाराष्ट्रात विपरीत परिणाम सर्व समाज बांधवांना सोसावा लागू शकतो. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तात्काळ झेड सुरक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आप्पासाहेव कुढेकर, किरण तारख, पांडुरंग तारख, शैलेश पवार, संजय कटार, ॲड.अमोल लहाने, सुदाम मुकणे, बाळासाहेब जाधव, किशोर मरकड, अशोक तारख यांच्या सह्या आहेत.