वीज वितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:33 AM2018-06-28T01:33:04+5:302018-06-28T01:33:17+5:30
वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलना दरम्यान शेतकऱ्याचा जो मृत्यू झाला, त्या प्रकरणात वीज वितरण कंपनी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयास गुरूवारी कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलना दरम्यान शेतकऱ्याचा जो मृत्यू झाला, त्या प्रकरणात वीज वितरण कंपनी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयास गुरूवारी कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या संदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवळी, राज्य उपाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब कदम यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या काही महिन्यांमध्ये वीज वितरण कंपनीने थकबाकीच्या मुद्यावरून जो वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक वैतागले आहेत.
पिकांना पाणी तर सोडाच परंतू गावात वीजच नसल्याने सर्वव्यवहार ठप्प झाले आहेत. दळणही शेजारच्या गावातून दळून आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याचे सुरेश गवळी यांनी सांगितले.
तर जिल्ह्यात सत्ता केंद्र असताना वीज वितरण कंपनीची वीजपुरवठा तोडण्याची हिंमत होतीच कशी, असा सावाल डॉ. कदम यांनी बोलून दाखवला. गेल्या वर्षभरात वीज कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे सहा जणांना जीव गमवावा लागल्याचे ते म्हणाले.