आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:57 AM2021-02-05T07:57:51+5:302021-02-05T07:57:51+5:30
३४९ कर्मचाऱ्यांना दिला कोरोनाचा डोस भोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आरोग्य केंद्रांतर्गत ३४९ जणांना कोरोनाची लस देण्यात ...
३४९ कर्मचाऱ्यांना दिला कोरोनाचा डोस
भोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आरोग्य केंद्रांतर्गत ३४९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी आर.एम. चंदेल यांच्या देखरेखीखाली मोहीम राबविण्यात आली. या वेळी डॉ. आर.एम. चंदले, डॉ. एस.बी. बावस्कर, डॉ. ए.बी. नागरे, भगवान ठोंबरे, रामेश्वर हजारे, डॉ. सिद्दिकी अहमद, डॉ. निर्मला गायकवाड, के.आर. भालके, प्रदीप देशमुख आदींची उपस्थिती होती.
मोकाट जनावरांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय
जालना : शहरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. यापूर्वी नगरपालिका आणि वाहतूक शाखेच्या वतीने मोकाट जनावरांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु, ती मोहीम नंतर बंद करण्यात आली आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
देशमुख यांना सुबोध कुराणची प्रत भेट
टेंभुर्णी : सध्या जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने ‘अंधारातून प्रकाशाकडे’ हे राज्यव्यापी अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांना सुबोध कुराण ही मराठी आवृत्तीची प्रत भेट देण्यात आली. या वेळी शेख लुकमान, शेख तालेब, शाजिल शहा, हाफिज नईम आदींची उपस्थिती होती.
रविवारी मानवाधिकार असोसिएशनची बैठक
जालना : इंडियन मानवाधिकार असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक रविवारी ७ फेब्रुवारी रोजी औरंगाबादेत होणार आहे. या बैठकीस असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.एस. यादव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बैठकीस जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव अभिजित शेजवळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
दलित पँथरचे विविध मागण्यांसाठी निवेदन
जालना : भारतीय दलित पँथर संघटनेच्या वतीने शहरातील आनंदनगर, जयनगर, आदर्शनगर, मातोश्री रमाबाईनगर, रेल्वे क्वॉर्टर्स परिसरात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष गौतम वाघमारे, बाबासाहेब लांडगे, विलास भिंगारे व इतरांची स्वाक्षरी आहे.