मंठ्यातील ३५ गावांत पाणीटंचाई, टँकरची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:56 AM2018-04-30T00:56:37+5:302018-04-30T00:56:37+5:30
मंठा तालुक्यात ३५ गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून, पाणी टंचाई निवारण करण्यासाठी १० गावाच्या ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्यात ३५ गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून, पाणी टंचाई निवारण करण्यासाठी १० गावाच्या ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली आहे. तर २५ गावातील पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. तालुक्यात सध्या विहिरी, तलाव, बोअरचे पाणी आटत असल्याने अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची ओरड होत आहे. टंचाईग्रस्त गावात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मंठा तालुका डोंगराळ असल्याने अनेक गावात माणसाबरोबरच जनवरांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तालुक्यातील ८ गावे व २ वाड्यांच्या ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे टँकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिका-यांकडे केली आहे. त्यामध्ये शिवणगिरी, लिंबखेडा, दहिफळ खंदारे, बेलोरा, बेलोरा तांडा, पांगरा गडदे, नानसी, गेवराई, किर्ला, किर्ला तांडा या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील २५ गावातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हाधिका-यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याचे पं.स. पाणी पुरवठा विभागाचे एस.एस. पैठणकर यांनी सांगितले. या अंतर्गत विहीर दुरूस्ती, आडवे बोअर, गाळ काढणे आदी कामे होणार आहेत. यामध्ये आर्डा खारी, हेलस, माळकिनी, पांगरी बु., शिरपूर, अंभुरा शेळके, वाघाळा, किर्ला, वझर सरकटे, पांगरी गोसावी, गुळखंड तांडा, वाटूर तांडा, धोंडी पिंपळगाव, तळणी, गुळखंड, दुधा, पांगरीबुद्रूक, केंधळी, बरबडा, पिंपरखेडा खराबे आदींचा समावेश असल्याचे सभापती म्हस्के म्हणाल्या.