दानवे, खोतकरांचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:59 AM2019-03-03T02:59:36+5:302019-03-03T02:59:55+5:30
अर्जुन खोतकर हे शनिवारी आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमात ते ‘गळ्यात गळा’ घालून एकमेकांशी सस्नेह गप्पा मारतानाही दिसले.
- संजय देशमुख
जालना : वर्षभरापासून एकमेकांना पाण्यात पाहणारे व अलिकडच्या काळात कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बनलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे शनिवारी आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमात ते ‘गळ्यात गळा’ घालून एकमेकांशी सस्नेह गप्पा मारतानाही दिसले.
जालन्यात खा. दानवे यांच्या पुढाकाराने हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. आपल्या भाषणात दोघांनीही एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख केला. अलिकडे प्रत्येक कार्यक्रमात भाजपावर तुटून पडणारे खोतकर अत्यंत सौम्य भाषेत बोलताना दिसून आले. त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख जवळपास पाच ते सात वेळा केला. मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तीन वेळेस नाव घेतले. खा. दानवे यांना खासगीत ‘दादा’ या नावाने संबोधले जाते. तसाच उल्लेख खोतकरांनी केला. विशेष म्हणजे आपले राजकीय आरोग्य हे जनतेच्या हाती असते असेही खोतकर म्हणाले.
>दानवे यांनी खोतकरांचा उल्लेख अर्जुनराव, असा केला. दानवे म्हणाले की, विकास कामांच्या बाबतीत आम्ही पक्षभेद विसरून एकत्र येतो. त्यामुळे मी आणि अर्जुनराव यांना एकाच व्यासपीठावर पाहून विशेषत: माध्यमांमध्ये मोठी उत्सुकता होती, परंतु हे राजकीय बोलण्याचे ठिकाण नसून, आम्ही कुठे बोलतो आणि कुठे भेटतो, हे जाहीर करण्याची गरज नाही. आम्ही युतीचे शिलेदार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
>वादाचा इतिहास काय?
जालना बाजार समितीच्या निवडणुकीत संचालक पदाच्या जास्त जागा भाजपाने मागितल्या होत्या. त्या देण्यावरून खोतकर आणि दानवे यांच्यात रस्सीखेच झाली होती. शेवटी तीन जागा शिवसेनेने भाजपाला देतानाच दानवे यांचे चुलतबंधू भास्कर दानवे यांना उपसभापतीपद दिले. हा वाद मिटतो न मिटतो तोच २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपाला सर्वाधिक २२, तर शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपसोबत युती करून जिल्हा परिषद युतीच्या ताब्यात ठेवावी असा आग्रह दानवे यांनी धरला होता. तो फेटाळून लावत अर्जुन खोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधून जिल्हा परिषदेत चुलत भाऊ अनिरूध्द खोतकर यांना अध्यक्षपदी विराजमान केले. उपाध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे दिल्याने दानवे आणि खोतकरांमधील दरी वाढत गेली होती.
>दोघांमध्ये अर्धा तास चर्चा : आरोग्य शिबिराचा उद्घाटन सोहळा संपल्यानंतर रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या घरी येतानाही खा. दानवे आणि राज्यमंत्री खोतकर हे एकाच गाडीतून आले. घरी आल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना थांबवून त्यांनी किमान अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. ही चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचे नंतर दोघांच्या देहबोलीवरून दिसून आले. ती चर्चा का झाली, हे मात्र कळू शकले नाही.