भोकरदनमध्ये दानवे विरूद्ध दानवेच; अनेक इच्छुकांचा हिरमोड, अपक्षांची संख्या वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 08:16 PM2024-10-26T20:16:37+5:302024-10-26T20:17:17+5:30
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी, यासाठी २० जणांनी गाठली अंतरवाली सराटी
भोकरदन : जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आ. संतोष दानवे विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यातील लढत उमेदवारीच्या घोषणेमुळे निश्चित झाली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी, यासाठी मतदार संघातील २० जणांनी अंतरवाली सराटी गाठली आहे.
भाजपकडून आ. संतोष दानवे यांचे नाव प्रथम जाहीर झाले होते. तर मविआत काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव सेनेने या मतदार संघावर दावेदारी सांगितली होती. परंतु, जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाजी मारत चंद्रकांत दानवे यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनच इच्छूक असणाऱ्या जाफराबादच्या नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांचा हिरमोड झाला आहे. शिवाय काँग्रेससह उद्धवसेनेच्या इच्छुकांच्या आशेवरही पाणी पडले आहे. त्यामुळे हे इच्छूक मित्रपक्षात, स्व पक्षात काम करणार की अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे लवकरच समोर येणार आहे.
भोकरदन विधानसभा मतदार संघात २०१४ पासून भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदार संघातून भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेत चंद्रकांत दानवे आघाडीवर होते. त्यात आता दानवे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित झाल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या इच्छुकांनी मनोज पाटील जरांगे यांच्याकडून निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली आहे. जरांगे पाटील यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी २० हून अधिक इच्छुकांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे जरांगे पाटील या मतदार संघात उमेदवार देणार का ? आणि दिला तर तो कोण असणार ? याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.
पक्षश्रेष्ठींची होणार कसरत
भोकरदन विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. काहींनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाचा प्रभावही या मतदार संघावर दिसून आला आहे. त्यामुळे काही पदाधिकारी, नेतेमंडळी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची चिन्हे असून, प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बंडाळी होवू नये, यासाठी आता पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागणार आहे.