दानवेंच्या मंत्रिमंडळ समावेशाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:31 AM2019-05-31T00:31:04+5:302019-05-31T00:31:42+5:30
जालन्याचे खासदार म्हणून सलग पाच वेळेस निवडून आलेले रावसाहेब दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गुरूवारी राज्यमंत्री म्हणून सहभाग झाल्यावर जालना शहरासह जिल्ह्यात त्याचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्याचे खासदार म्हणून सलग पाच वेळेस निवडून आलेले रावसाहेब दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गुरूवारी राज्यमंत्री म्हणून सहभाग झाल्यावर जालना शहरासह जिल्ह्यात त्याचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. जुना तसेच नवीन जालना भागात भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. गांधी चमन, बडी सडक तसेच संभाजीनगरमधील भाजपच्या जिल्हा कार्यालयात जोरदार आतषबाजी करण्यात आली. काही पदाधिकाऱ्यांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती.
जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडणून येण्याचा विक्रम रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच त्यांच्या या पक्ष कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा संधी दिली होती. मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळातही दानवेंना अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून स्थान दिले होते. परंतु नंतर त्यांच्यावर महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली. ती त्यांनी अत्यंत प्रभावीपणे स्वीकारून संपूर्ण राज्यात भाजपची चौफेर घोडदौड केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना गुरूवारी मंत्रिमंडळात स्थान दिले.
दानवेंना मंत्रिमंडळात घेणार यांची माहिती भाजपच्या नेते, पदाधिका-यांना होती. त्यामुळे त्यांनी बुधवारीच दिल्ली गाठली होती. गुरूवारी सकाळपासूनच दानवेंचे नाव विविध माध्यमातून मंत्रिमंडळाच्या यादीत असल्याची माहिती प्रसारित होत होती. आणि सायंकाळी ज्यावेळी रावसाहेब दानवे यांनी शपथ घेतल्यावर तर जालन्यात जणू काही दुसरी दिवाळीच साजरी करण्यात आली.
सर्वत्र ढोलताशांच्या गजराने वातावरण उत्साही बनले होते. भाजपच्या संभाजीनगर येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयाजवळ पदाधिका-यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
मोठ्या स्क्रीनवर पाहिला शपथविधी
जुना जालना भागातील गांधी चमन येथे भाजपच्या वतीने मोठा डिजिटल स्क्रीन लावला होता. त्यावर लाइव्ह शपथविधी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ज्यावेळी दानवेंनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी उपस्थितांनी भारत माता की, जय आणि मोदी-मोदी अशा घोषणा दिल्याने, परिसर दुदुमून गेला होता.