जालना जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:52 AM2019-11-08T00:52:39+5:302019-11-08T00:53:01+5:30

जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे.

Dengue prevalence in Jalna district ... | जालना जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव...

जालना जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जागोजागी नष्ट न होणारे पाणीसाठे तयार झाले आहे. यामुळे डेंग्यूच्या डासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. जिल्हाभरात आतापर्यंत ४७ जणांना डेंग्यू असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्यापैकी २५ रूग्ण हे जालना शहरातील आहेत.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने नदी, नाल्यांना पाणी आले. वातावरण बदल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे शासकीय रूग्णालयांपासून ते खाजगी रूग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती.
पावसामुळे जागोजागी नष्ट न होणारे जलसाठे तयार झाले. यामुळे डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भावही वाढला. त्यामुळे जिल्हाभरात डेंग्यूचा फैलाव वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.
यात जालना शहरात सर्वाधिक डेंग्यूचे रूग्ण असून, ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी आहे.
जालना शहरात २५ तर ग्रामीण भागात २२ जणांना डेंग्यू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.
खाजगी रूग्णालयात रूग्ण उपचारासाठी येतात. तेव्हा डेंग्यू असला की, त्याची माहिती खाजगी रुग्णालयांकडून जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला कळविण्यात येते.
त्यानंतर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून सदर व्यक्तींचे रक्त, जलनमुने घेतले जातात.
हे नमुने औरंगाबाद येथील मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येतात.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने १४१ जणांचे नमुने मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४७ जणांना डेंग्यू असल्याचे समोर आले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळेना
सध्या आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत जनजागृती करीत आहेत. तसेच प्रत्येक घरात जाऊन जलसाठे रिकामे करण्याचा प्रयत्नही आरोग्य कर्मचारी करीत आहेत. परंतु, नागरिक आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ५०० कर्मचारी डेंग्यू संदर्भात जनजागृती करीत आहेत. याबरोबर हे कर्मचारी जलसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडत आहेत. हे मासे डेंग्यूचे डास खाऊन घेतील.
काय करावे ?
घरातील पाणीसाठे नष्ट करावेत
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.
ताप आल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.
नागरिकांनी घरात स्वच्छता बळगावी.
झोपताना मच्छर दाणीचा उपयोग करावा.
डास चावणार नाही याची काळजी घ्यावी.

Web Title: Dengue prevalence in Jalna district ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.