कुंभार पिंपळगाव परिसरात डेंग्यूचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:37 AM2018-10-01T00:37:41+5:302018-10-01T00:38:12+5:30
कुंभार पिंपळगाव परिसरात डेंग्यूने पीडित असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये या आजाराच्या भीतीने दहशत पसरली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : कुंभार पिंपळगाव परिसरात डेंग्यूने पीडित असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये या आजाराच्या भीतीने दहशत पसरली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी स्वच्छता जागरण मोहीम सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कुंभार पिंपळगाव परिसरात मागील दोन महिन्यांपासून तापाची साथ पसरल्याने योग्य उपचाराअभावी काही नागरिकांना डेंग्यू आणि मलेरिया च्या आजाराने ग्रासले आहे. तर गावातील स्वच्छता मोहीम थांबल्याने पसरलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू तापाची साथ पसरली आहे.
नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, परंतु काही रुग्ण ताप आल्यावर आधी गावातील बोगस डॉक्टरांकडून प्रथमोपचार करीत आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
तर अनेक गावांमध्ये तापाच्या साथीने रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गाववस्त्यांमधील पसरलेल्या घाणीमुळे व साचलेले पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतने स्वच्छता मोहिमेला गती देण्याची गरज आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी औषधांची फवारणी आवश्यक आहे.
परंतु प्रशासकीय स्तरावर पुढाकार घेण्यास ग्रामपंचायत मागे पडत असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना तत्परतेने उपचारासाठी पथक तयार करून सेवा देण्याची गरज आहे.
तसेच अस्वच्छतेमुळे डासांची होणारी वाढ नष्ट करण्यासाठी स्वच्छता जागरण मोहीम सुरू करावी व तापाची साथ पसरू नये यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाने उपाय सुचविण्याची मागणी होत आहे.