आरोग्य विभाग सक्षम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:41 AM2020-01-28T00:41:49+5:302020-01-28T00:42:34+5:30
सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
जालना : सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रविवारी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नाराण कुचे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसय्यै, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, तहसीलदार संतोष बनकर, प्रशांत पडघन, भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
टोपे म्हणाले, मराठवाडा विभागासाठी आजपर्यंत मनोरुग्णांच्या उपचारासाठी मनोरुग्णालय नव्हते. जालना येथे या मनोरुग्णालयाच्या उभारणीसाठी शासनाने मंजुरी दिली असून, येत्या महिन्याभरात या मनोरुग्णालयाच्या कामास प्रारंभ होणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांना व नियमित कर्जाची परतफेड करणाºयांना योजना लागू करण्याचा विचार सुरू आहे. पीकविमा, पीककर्जापासून शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये ३५० पेक्षा अधिक गावांची निवड करण्यात आली आहे. ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी केली.
यावेळी पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँडपथक, महिला सुरक्षा दामिनी पथक, दंगल नियंत्रण पथक, अग्निशामक दलासह विविध विभागाच्या चित्ररथांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचलन निशिकांत मिरकले यांनी केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनींची उपस्थिती होती.
मतदान आपल्या सर्वांचे कर्तव्य
आपली लोकशाही अधिक मजबूत होत आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणाºया ७३ व ७४ व्या घटना दुरुस्त्या लक्षात घेता या वर्षामध्ये व त्यापुढे होणाºया सर्व निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घ्यावा. तसेच स्वत:बरोबर इतर सहकाºयांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही टोपे यांनी यावेळी केले.