झेडपी शाळेची दयनीय अवस्था; तुटक्या पत्रावर बसून ग्रामपंचायत सदस्याचे अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 05:44 PM2024-07-03T17:44:50+5:302024-07-03T17:45:09+5:30
अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील जिल्हा परिषदेची शाळेची दयनीय अवस्था
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : अंबड तालुक्यातील दाढेगांव येथील जिल्ह परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधकाम करावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्त त्वरित जमा करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य राजू दशरथ काकडे यांनी मंगळवारपासून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. दुरावस्था झालेल्या शाळेच्या पत्रावर बसून काकडे यांनी बेमुदत उपोषण सूरू केल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आज उपोषणाचा दूसरा दिवस आहे.
अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील जिप शाळा १ ते ७ वी इयत्तापर्यंत असून ८ वर्ग खोल्यात १६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनिय अवस्था झालेली आहे. सदर इमारत कधी पडेल हे सागता येत नाही. इमारत दुरुस्तीसाठी जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी, पंचायत समिती, गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केलेली आहे. परंतु अद्याप या जिर्ण झालेल्या शाळेच्या जागी नवीन इमारत किंवा याची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे ग्रामपंचायत सदस्य राजू दशरथ काकडे यांनी दुरुस्ती अथवा नवीन इमारतीची मागणी करत शाळेच्या पत्रावर बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भरपावसात ही ते उपोषण करत आहेत. दरम्यान, उपोषण स्थळी गटशिक्षण अधिकारी यांनी भेट दिली आहे. मात्र, लेखी आश्वासन देण्याची उपोषणकर्ते काकडे यांनी मागणी केली आहे.
अहवाल जिल्हा परिषदेला पाठवला
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणअधिकारी यांनी भेट देऊन मागण्या बाबत लेखी आश्वासनाशिवाय उपोषण सोडणार नाही, असे उपोषणकर्त्याने जाहीर केले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा परीषदकडे पाठवला आहे.
- गोविंद चव्हाण,गटशिक्षणाधिकारी अंबड
शाळेसाठी त्वरित निधी द्यावा
जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यात जमा करण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, कुठलीही दखल घेतलेली नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याने शाळेच्या दयनीय अवस्थेची पाहणी करावी. तसेच शाळेसाठी ताबडतोब निधी देण्यात यावा.
- राजू दशरथ काकडे, दाढेगाव ता. अंबड, ग्रामपंचायत सदस्य (उपोषणकर्ते)