हद्दपार डिंगऱ्या ‘एडीएस’च्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:26 AM2019-10-11T00:26:47+5:302019-10-11T00:27:20+5:30
दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला विलास उर्फ डिंग-या हौशीराम सोनकांबळे याला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला विलास उर्फ डिंग-या हौशीराम सोनकांबळे याला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई गुरूवारी सकाळी शहरातील चंदनझिरा भागात करण्यात आली.
जालना शहरातील सिध्दार्थनगर भागातील निळ्या किल्ल्याजवळ राहणारा विलास उर्फ डिंग-या हौशीराम सोनकांबळे याच्याविरूध्द अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सदरबाजार पोलीस ठाण्याच्या वतीने सोनकांबळे याला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिका-यांनी जानेवारी २०१९ मध्ये आदेश काढून सोनकांबळे याला तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले होते. पोलिसांनी त्याला देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) येथे सोडले होते. मात्र, हद्दपार असतानाही सोनकांबळे हा जालना शहरातील चंदनझिरा भागात आल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पो.नि. यशवंत जाधव यांना मिळाली होती.
या माहितीवरून पो.नि. जाधव व त्यांच्या सहका-यांनी गुरूवारी सकाळी कारवाई करून विलास सोनकांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण आदींनी केली.
एडीएसच्या पथकाने चंदनझिरा येथील अनिल बोर्डे यांच्या घरासमोर कारवाई करून सोनकांबळे याला ताब्यात घेतले. पोहेकॉ. ज्ञानदेव नागरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम १४२ मपोका नुसार चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नापोकॉ नरवडे हे करीत आहेत.