अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकरी आक्रमक; अंबड - पाथरी मार्गावर रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 06:32 PM2023-04-21T18:32:26+5:302023-04-21T18:33:02+5:30
जिल्ह्यातील १९ मंडळांमधील गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले आहे.
- दिगंबर गुजर
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ या दोन महसूल मंडळांतील ३३ गावांमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही शासन मदत देत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी कुंभार पिंपळगाव येथे सकाळी अंबड - पाथरी मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात कुंभार पिंपळगाव येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील १९ मंडळांमधील गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले आहे. यात घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ मंडळांचा समावेश आहे. या भागातील गावांमध्येही खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. सततच्या अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना तयार झाली आहे. शासनाने भेदभाव न करता अनुदान द्यावे, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार खैरनार हे येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, एक तास उलटूनही नायब तहसीलदार न आल्याने मंडळ अधिकारी एस. बोटुळे व पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनात रवींद्र तौर, गोविंद आर्दड, रखमाजी सुरासे, पिनू राऊत, कल्याण कंटुले, बन्सी शेळके, सिद्धेश्वर कंटुले, अतुल कंटुले, विलास काळे, गणेश आर्दड, विजय कंटुले, गजानन तौर, सुरेश काजळे, राजू धनवडे, नागनाथ जाधव, पंडित पवार यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त, मग वगळले कसे?
अतिवृष्टीचे अनुदान जाहीर करताना २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी जाहीर करण्यात येते. परंतु, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ येथील पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त असताना पावसाची नोंद कशी घेतली, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.