जांबसमर्थचा ४०० कोटींचा विकास आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:58 AM2017-12-26T00:58:15+5:302017-12-26T00:58:24+5:30
समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ येथे पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चारशे कोटींच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ येथे पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चारशे कोटींच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला असून, अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
जालना येथील श्रीराम मंदिरात समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडहून आलेल्या समर्थांच्या पादुकांचे पूजन आज लोणीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
समर्थांचे अकरावे वंशज भूषण महारुद्र स्वामी, कल्याण महाराज आचार्य, विनायक देहेडकर, विलास तांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती ़
लोणीकर म्हणाले, की पर्यटन विभागाकडून जांब समर्थ येथील तीर्थक्षेत्रासाठी ४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून समर्थ रामदास स्वामी यांच्या वस्तूंचे संग्रहालय तयार करण्यात येणार आह. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ५६ लाख रुपयांच्या योजनेला राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून, हे काम तात्काळ मार्गी लागेल.
शेगाव, शिर्डी व पैठण तीर्थक्षेत्राप्रमाणे जांबसमर्थचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असून, हरिकीर्तनाची आवड असल्याचे ते म्हणाले.
यावेळी ह.भ.प. सान्नाबुवा रामदासी, मुकुंद गोसावी, यज्ञेश्वर जोशी, गिरीश देशमुख, आदित्य देशपांडे, सुनील कंडारकर, लक्ष्मीकांत देशमुख, अशोक अकोलकर, उदय कुलकर्णी, लक्ष्मीकांत बळद, ओंकार देशपांडे, अभय साकळगावकर, हिवरेकर, विद्या कुलकर्णी, सुनंदा गोसावी, छाया कोठीकर आदींची उपस्थिती होती़