अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा राजुरेश्वरकडे ओढा; ६५ एसटी बसेसची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 02:56 PM2024-06-24T14:56:53+5:302024-06-24T14:57:01+5:30

गेल्या वर्षी साडेचार लाख भाविकांनी दर्शन घेतले होते, परंतु यंदा साडेसहा लाख भाविक येण्याची शक्यता आहे.

devotees eye towards Rajureshwar on the occasion of Angaraki Sankashti Chaturthi; Arrangement of 65 ST buses | अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा राजुरेश्वरकडे ओढा; ६५ एसटी बसेसची व्यवस्था

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा राजुरेश्वरकडे ओढा; ६५ एसटी बसेसची व्यवस्था

राजूर (जालना) : गेल्या दीड वर्षानंतर २५ जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून येथील राजुरेश्वरांच्या दर्शनासाठी साडेसहा लाख भाविक येणार आहेत. गर्दी लक्षात घेऊन भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनातर्फे विविध उपायोजना राबविण्यात आल्या असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक संजय आहिरे यांनी दिली.

यंदा पेरणीची कामे आटोपल्याने शेतकऱ्यांना कामातून उसंत आहे. त्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थीला साडेसहा लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. यात राज्य परिवहन महामंडळाकडून ६५ एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सोमवारी सायंकाळी राजूर येथील बस स्थानक परिसरात ५० एसटी बसेस मुक्कामी थांबणार आहेत, अशी माहिती जालना बस स्थानक प्रमुख अजिंक्य जैवळ यांनी दिली.

पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राजूर परिसरात पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. यात टेंभुर्णी, जालना, चणेगांव, चांदई एक्को आणि भोकरदन रोडवर ही पार्किंग ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी रोडवर वाहने उभी करू नये, पार्किंगमध्येच वाहने पार्क करावी.

सीसीटीव्हीची नजर
राजुरेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते. या संधीचा फायदा घेत, चोरट्यांकडून मुलांसह महिलांच्या अंगावरील दागिने चोरीला जातात. त्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

दोन कंट्रोल रूम
राजूर येथे भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनातर्फे दोन कंट्रोल रूमची उभारणी केली आहे. यात एक कंट्रोल रूम सर्वसामान्यांसाठी आहे. या ठिकाणाहून भाविकांना वारंवार ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सूचना करण्यात येणार आहे.

तीन वैद्यकीय पथके तैनात
राजुश्वरांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने प्रशासनाकडून तीन विशेष वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे. ही पथके राजूर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणार आहे. परिसरात अग्नीशमन आणि रुणवाहिकाही तैनात आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयही केली आहे.

साध्या वेश्यात पोलिसांची गस्त
राजूर येथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. यात ३० वरिष्ठ पोलिस अधिकारी, २३० अंमलदार आणि ३०० होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात साध्या वेशामध्येही पोलिस गस्त घालणार आहेत.

भाविकांनी काळजी घ्यावी
गेल्या वर्षी साडेचार लाख भाविकांनी दर्शन घेतले होते, परंतु यंदा साडेसहा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी. चिमुकल्यांसह महिलांच्या अंगावरील दागिने, मोबाइल, सोबत आणलेल्या वस्तूंची खात्री करावी, वाहने कुठेही पार्क करू नयेत.
- संजय आहिरे, सहायक पोलिस निरिक्षक, हसनाबाद पोलिस ठाणे.

Web Title: devotees eye towards Rajureshwar on the occasion of Angaraki Sankashti Chaturthi; Arrangement of 65 ST buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalanaजालना