राजूरनगरीत भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:39 AM2018-01-19T00:39:33+5:302018-01-19T00:39:55+5:30
श्री जन्मोत्सवानिमित्ताने राजूर नगरी भक्तांच्या मांदियाळीने दुमदुमून गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : श्री जन्मोत्सवानिमित्ताने राजूर नगरी भक्तांच्या मांदियाळीने दुमदुमून गेली आहे. रामकृष्ण हरी, ज्ञानदेव तुकारामाच्या गजर अखंडित सुरू असून श्री जन्मोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे राजूर परिसरात चैतन्यमय वातावरण पसरले आहे.
श्रीगणेश जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हभप जगन्नाथ महाराज यांच्या वाणीतून राम कथेचे वाचन सुरू आहे. यावर्षी हरिनाम सोहळ्याने ५१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. रविवारपासून दिवस-रात्र भरगच्च धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे. यात हभप सोपान महाराज शास्त्री, संजय महाराज कावळे, निवृत्ती महाराज इंदोरीकर, गोविंंद महाराज चौधरी यांनी कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, विश्वशांती, अंधश्रध्दा आदी विषयावर समाजप्रबोधन केले.
सोहळा यशस्वीतेसाठी संयोजक विष्णू महाराज सास्ते, माजी सरपंच शिवाजी पुंगळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, भीकनराव पुंगळे, विष्णू राज्यकर, कैलास पुंगळे, देवराव डवले, गणेश साबळे, श्रीमंता पुंगळे, श्रीरामपंच पुंगळे, नारायण पुंगळे, कृष्णा जाधव, गजानन जामदार, अप्पासाहेब पुंगळे, भारतअप्पा कोमटे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते रविवारी सकाळी ९ वाजता श्रींची महापूजा होणार आहे. दुपारी १२ वाजता राजूरेश्वराचा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी श्रीस वस्त्रालंकार चढविण्यात येणार आहे. तसेच रात्री ९ वाजता मंदिरातून श्रीची पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे. परिसरातील भाविकांनी जन्म सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानच्या अध्यक्षा तथा तहसीलदार योगिता कोल्हे, व्यवस्थापक गणेशराव साबळे आदींनी केले आहे.