धामना धरणात झाला ९० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:39 AM2019-07-01T00:39:23+5:302019-07-01T00:39:43+5:30

भोकरदन तालुक्यातील शेलूद परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे येथील धामना धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे

Dhamna dam got 90 percent water stock | धामना धरणात झाला ९० टक्के पाणीसाठा

धामना धरणात झाला ९० टक्के पाणीसाठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील शेलूद परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे येथील धामना धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे परिसरातील पंधरा गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला.
दुष्काळामुळे परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरु होती. जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, आता आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरु असल्याने कोरडाठाक असलेल्या धामना धरणात मुबलक पाणी आले आहे. त्यामुळे जळगाव सपकाळ, आन्वा, हिसोडा, लेहा, पिंपळगांव रेणुकाई, पारध, वडोद तांगडा, धावडा, दहिगांव, करजगांव, कल्याणी व सिल्लोड तालुक्यातील मादणी, जळकी बाजार आदी गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे संपूर्ण धरण भरण्याची आशा ग्रामस्थांना लागली आहे.
हसनाबाद येथील टँकरचे पाणी बंद
हसनाबाद येथे दुष्काळ काळात पाणीपुरवठा करणारे टँकर पाऊस पडल्याने एकाच ठिकाणी उभे आहे. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हसनाबाद १० हजार लोकसंखेचे गाव आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांना पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. पाणी पुरवठ्यासाठी गावाला तीन पाणी पुरवठा योजना आहेत. मात्र गिरीजा नदीलाच पाणी नसल्याने सार्वजनीक नळाला पंधरा दिवसानंतर अर्धा तास पाणी मिळत असे. ग्रामपंचायतने मागणी केल्यानंतर दोन टँकरद्वारे सोमठाणा तळ्याजवळून चोवीस हजार लिटर पाणी आणून विहीरीत सोडत व नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा सुरु होता. एक महिना गावास पाणी पुरवठा सुरळीत सुरू होता. मात्र पंधरा दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यात झालेल्या पावसात एक टँकर चार पाच दिवस गाळात रुतला होता. तसेच परवा पडलेल्या पावसामुळे हे दोन्ही टँकर हसनाबाद ग्रा.प. आवारात उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे आठवड्यापासून टँकरव्दारे पाणी पुरवठा बंद झाल्याने गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: Dhamna dam got 90 percent water stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.