धामणा प्रकल्प ओव्हरफ्लो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:39 AM2019-07-06T00:39:41+5:302019-07-06T00:39:54+5:30
शेलूद येथील धामणा धरण शनिवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण शनिवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धरणाची पाहणी करून अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर धरणाच्या सांडव्याला लागलेली गळती थांबविणे व इतर दक्षतेच्या उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांनी प्रकल्पावरच ठाण मांडले आहे.
धामणा धरणाच्या सांडव्यातून पाणी गळती सुरू होती. त्यामुळे धरण फुटण्याच्या अफवेने सर्वत्र भीतीचे वातावरण होते. यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. संतोष दानवे, अधीक्षक अभियंता तारक, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, माजी आमदार चंद्रकांत दानवे, तहसीलदार संतोष गोरड, गटविकास अधिकारी डॉ अरुण चोलवार यांनी ४ व ५ जुलै रोजी धरणावर जाऊन गळतीची पाहणी केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने ताडपत्री टाकून गळतीचे प्रमाण कमी केले. शिवाय विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे नदीचे खोलीकरण सुरू केले आहे. त्याचप्रमाणे या धरणाच्या भिंतीवर असलेली झाडे काढण्याचे काम सुरू आहे. मात्र शनिवारी धरण्याच्या वरच्या भागात पाऊस झाला आणि पाण्याचा ओघ वाढत गेला. त्यामुळे धरण ओसंडून वाहत आहे. पाऊस वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे तहसीलदार संतोष गोरड व विविध विभागाचे अधिका-यांसह २० ते २५ कर्मचाºयांचा ताफा धरणावर ठाण मांडून आहे. शिवाय भोकरदन नगर परिषदची अग्निशमन पथक, बोट ही शेलूद गावात दाखल झाले आहे. दरम्यान, धामणा मध्यम भरल्याने दोन सेंटीमीटर (विसर्ग) सांडव्यावरुन अल्पत: ओहरफ्लो होत आहे. या प्रकल्पाच्या धरणाच्या खालील नदी काठावरील गावातील नागरिकांनी जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
दानापूरचे जुई धरण भरण्याच्या मार्गावर
भोकरदन तालुक्यात पडलेल्या दमदार पावसामुळे जुई, धामणा व पद्मावती या तिन्ही धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. धामणा धरण आज ओव्हरफ्लो झाले. तर जुई धरणात १६ फूट पाणीसाठा झाला आहे.
केवळ १ फूट धरण भरण्यासाठी बाकी असून, पद्मावती धरणात जवळपास ६० टक्के पाणी आले आहे. जुई धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने भोकरदन शहरासह २५ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.
१० गावांचा पाणीप्रश्न मार्गी
धामणा धरणात सध्या १०.७२ दलघमी पाणी साठा आहे. या धारणावरून १० गावांना पाणीपुरवठा होतो. तर १ हजार ७८८ हेक्टर क्षेत्र सिंचन खाली येते. मराठवाड्यात सर्वात प्रथम शेलूद येथील धामण धरण ओव्हरफ्लो झाले आहे.