धनगर आरक्षण मोर्चास हिंसक वळण; आंदोलकांची जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड
By शिवाजी कदम | Published: November 21, 2023 04:14 PM2023-11-21T16:14:28+5:302023-11-21T16:14:49+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड, सुरक्षारक्षकांनी मुख्य दरवाजा बंद केल्याने अनर्थ टळला.
जालना : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रशासनाकडून कुणीही निवेदन स्विकारण्यास आंदोलन स्थळी न आल्याने, जमाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घुसला. जमावाने येथील दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड केली, तसेच येथील मातीच्या कुंड्याही फोडून टाकल्या. जमावाने कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील सुरक्षारक्षकांनी वेळीच मुख्य दरवाजा बंद केल्याने अनर्थ टळला.
जालना जिल्हा अनेक आंदोलनामुळे गाजत आहे. मंगळवारी पुन्हा आंदोलनास गालबोट लागल्याची घटना घडली. सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बायपास रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवून मंडप टाकण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी परिसरात आल्यानंतर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मंडपामध्ये सभा घेण्यात आली. सभेनंतर प्रशासन निवेदन देण्याचे आयोजकांनी ठरविले होते, परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निवेदन देण्यासाठी आंदोलनस्थळी यावे, असा आग्रह आयोजकांनी केला. प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत निवेदन स्विकारण्यासाठी येत नाही, तोपर्यंत ठाण मांडणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मात्र, अर्धा तास उलटूनही प्रशासनातील एकही अधिकारी आयोजन स्थळी न आल्याने मोर्चात सामील झालेले समाज बांधव आक्रमक झाले. त्यांनी प्रशासनाच्या विराेधात घोषणा देण्यास सुरुवात केली. आक्रमक जमावाने कार्यालय परिसरातील बाहेरील लोखंडी गेट ताडून आत प्रवेश केला. यानंतर, वाहनांची तोडफोड केली.
गाड्यांची तोडफोड
प्रशासनातील कुणीही अधिकारी निवेदन स्विकारण्यासाठी आले नसल्याने मोर्चात सामील झालेल्या आक्रमक जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सुमारे दहा दुचाकी आणि एक कारची ताेडफोड केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी वेळीच कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद केल्याने जमाव कार्यालयात घुसू शकला नाही.