धरण सुरक्षा समितीकडून धामणा धरणाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:42 AM2019-07-10T00:42:25+5:302019-07-10T00:43:21+5:30
धामणा धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे. त्यामुळे हे धरण फुटते की काय अशी भीती गेल्या आठवड्याभरापासून वर्तविली जात होती. परंतु, त्यात तथ्य नसल्याचा निर्वाळा राज्य धरण सुरक्षा समितीने केलेल्या पाहणीनंतर दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील शेलूद येथे १९७२ मध्ये बांधण्यात आलेल्या धामणा धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे. त्यामुळे हे धरण फुटते की काय अशी भीती गेल्या आठवड्याभरापासून वर्तविली जात होती. परंतु, त्यात तथ्य नसल्याचा निर्वाळा राज्य धरण सुरक्षा समितीने केलेल्या पाहणीनंतर दिला.
मंगळवारी राज्य धरण समितीचे कार्यकारी अभियंता प्रवीण मोहिते यांच्यासह अन्य तांत्रिक अभियंत्यांनी भेट दिली. यावेळी जालना येथील कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, चंद्रशेखर मोहंडे, टी.ई.गावडे, धामणा धरणाचे उपअभियंता एस.जी.राठोड यांची यावेळी उपस्थिती होती.
या समितीने धरण परिसर पिंजून काढला. जवळपास पाच तास ही पाहणी करून अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना दिल्या. तसेच ग्रामस्थांशी संपर्क करून धरणाला धोका नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांचीही उपस्थिती होती.