चार वर्षे झोपा काढल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:30 AM2019-07-05T00:30:06+5:302019-07-05T00:30:31+5:30

धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षांपासून झाडे वाढत असताना तुम्ही काय झोपा काढत होते का, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

Did you sleep for four years? | चार वर्षे झोपा काढल्या का?

चार वर्षे झोपा काढल्या का?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन (जि. जालना) : धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षांपासून झाडे वाढत असताना तुम्ही काय झोपा काढत होते का, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. धामना धरणाच्या सांडव्याची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी आ. संतोष दानवे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव, तहसीलदार संतोष गोरड, गटविकास अधिकारी अरूण चौलवार यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या भोकरदन तालुक्यावर आठवडाभरापासून पावसाची कृपा झाली आहे. मुसळधार पावसामुळे केळना, जुई या नद्या खळाळत्या झाल्या असून, परिसरातील धरणांतील पाणी झपाट्याने वाढले आहे. चार ते पाच वर्षांपासून कोरडे पडलेले शेलूद येथील धामना धरण तुडूंब भरले असून, धरणाच्या आणि सांडव्याच्या भिंतीला तडे गेल्याने पाणी वाहून जात आहे. दरम्यान, यामुळे धरण फुटण्याच्या चर्चा परिसरात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरूवारी धरणाला भेट दिली.
आयुक्त केंद्रेकर यांनी दोन किमी परिसरात असलेल्या धरणाच्या भिंतीची पाहणी केली. यावेळी त्यांना धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षापासून वाढलेली झाडे दिसली. तसेच भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेल्याचे दिसून आल्याने आयुक्तांचा पारा चढला. चार वर्ष तुम्ही काय झोपा काढत होता, काय, अशी विचारणा करीत आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान उपटले. काही दुर्घटना घडल्यास कोणाचीही हयगय करणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. केंद्रेकरांचा हा अवतार बघून अधिकार्यांमध्ये शांतता पसरली होती.
धरण फुटणार, अशी अफवा पसरल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीही धरणाला भेट देऊन पाहणी केली होती.
पाहणीनंतर आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धरण परिसरात २४ तास खडा पहारा ठेवण्यासह विद्युत पुरवठ्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. दरम्यान, सैन्यदलाची एक तुकडी मेजर गौरव यांच्या मार्गदर्शनाखाली शेलूद येथे दाखल झाली आहे.
पाटबंधारे विभागाने धरणाच्या ज्या ठिकाणाहून पाणी गळती होत होती. ती गळती थांबवण्यासाठी ताडपत्री टाकली आहे. त्यामुळे पाणी गळतीचा वेग कमी झाला असून, सांडव्यातून पाणी जात आहे. गुरुवारी पाऊस थांबल्याने धरणात येणारा पाण्याचा ओघ थांबला आहे. त्यामुळे धोका कमी झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Did you sleep for four years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.