अपक्षांमुळे बिघडते मतांचे गणित..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:36 AM2019-04-12T00:36:14+5:302019-04-12T00:36:35+5:30
अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते.
दीपक ढोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकशाही स्वीकारलेल्या भारतामध्ये निवडणूक लढविण्याचे अधिकार ज्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आहेत त्यात धर्तीवर अपक्ष उमेदवारांनाही निवडणूक लढण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळेच तुम्ही कुठल्याही पक्षाचे सक्रिय सदस्य नसलात तरी तुम्हाला निवडणुकीत उभे राहता येते.
जालना लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास पूर्वीपासूनच मतदारांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनाच आपल्या मतदानाने विजयी केले आहे. हे जरी खरे असले तरी अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंंगणात होते. पैकी अपक्षांची संख्या ११ होती. त्यावेळी प्रमुख राजकीय पक्ष अर्थात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात काट्याची टक्कर झाली. त्यावेळी काँग्रेसचे कल्याण काळे यांनी भाजपचे परंपरागत उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांना नाकी नऊ आणले. दानवे हे त्यावेळी केवळ ८ हजार ३०० मतांनी विजयी झाले होते. यावेळी ११ अपक्षांना पडलेल्या मतांचा विचार केल्यास अपक्षांनी आणखी जोर लावला असता तर जालना लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे दिसले असते. अपक्ष उमेदवारांमध्ये जिल्ह्यातील फारसे कोणी प्रतिष्ठित अथवा उच्च शिक्षित उमेदवार नसल्यानेही राजकीय पक्षांचे पितळ पांढरे होत गेले. एकूणच अपक्ष उमेदवार हे उमेदवारी दाखल करतात परंतु, त्यांना अवाढव्य असलेल्या लोकसभा मतदार संघात प्रचाराला फिरताना अनेक आव्हाने असतात. त्यात कार्यकर्त्यांचा अभाव, सक्षम आर्थिक क्षमता आणि कुठल्याही मुद्द्यावर मत मांडायचे झाल्यास मिळणारा प्रतिसाद हा अत्यल्प असतो. त्यामुळे अपक्ष उमेदवार मोठ्या हिमतीने रिंगणात उतरतात परंतु, जनमानसांकडून त्यांना मतांचे दान राजकीय पक्षांच्या तुलनेत खूप कमी दिले जाते. अपक्षांना कमी लेखून चालत नाही. परंतु, काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत आपल्या प्रतिस्पर्धेची मतविभागणी व्हावी म्हणून देखील अपक्षांना अप्रत्यक्षपणे उभे केले जाते.