अग्निशमन कार्यालयावरच ‘आपत्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:28 AM2021-01-21T04:28:12+5:302021-01-21T04:28:12+5:30

फोटो जालना : शहरासह परिसरातील विविध भागांत लागणारी आग असो अथवा उद्भवणारी आपत्ती असो; या काळात येथील अग्निशमन दलाचे ...

'Disaster' at fire station | अग्निशमन कार्यालयावरच ‘आपत्ती’

अग्निशमन कार्यालयावरच ‘आपत्ती’

Next

फोटो

जालना : शहरासह परिसरातील विविध भागांत लागणारी आग असो अथवा उद्भवणारी आपत्ती असो; या काळात येथील अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालून काम करतात. परंतु, हे कार्यालय असलेली निजामकालीन इमारत धोकादायक झाली असून, याच इमारतीत रात्रंदिन थांबण्याची वेळ येथील कर्मचाऱ्यांवर आली आहे.

जालना शहर, एमआयडीसी, बदनापूर, अंबड, देऊळगावराजा किंवा इतर ठिकाणी आगीसह इतर आपत्कालीन घटना सतत घडत असतात. अशा घटनांच्या वेळी जालना येथील अग्निशमन दलातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून संकटग्रस्तांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा विहिरीतील, तळ्यातील मृतदेह बाहेर काढण्यासाठीही त्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. या अग्निशमन विभागात एक अधिकारी आणि जवळपास २५ कर्मचारी कार्यरत आहेत. जालना शहरातील निजामकालीन इमारतीत अग्निशमन विभागाचे कामकाज सुरू झाले. या विभागात पाच वाहने आहेत. त्यांतील तीन वाहने ३५०० लिटर क्षमतेची, एक पाच हजार लिटर क्षमतेचे तर एक वाहन तीन हजार लिटर क्षमतेचे आहे. येथील अधिकारी, कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये कामकाज करतात. बारा-बारा तासांच्या पाळ्यांमध्ये चालणारे कामकाज हे धोकादायक अशा निजामकालीन इमारतीत सुरू आहे. सर्वसामान्यांना एक मिनिट थांबणेही धोकादायक वाटावे, अशी अवस्था असलेल्या याच इमारतीत हे कर्मचारी रात्रंदिन थांबून असतात. विशेष म्हणजे पावसाळ्यात तर इमारतीला चारीही बाजूंनी गळती लागते. या इमारतीची वेळेवर डागडुजी करण्याची मागणी होऊनही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. घरून आणलेल्या पाण्यावर किंवा हॉटेलमध्ये जाऊन त्यांना तहान भागवावी लागते. येथे स्वच्छतागृहाचाही अभाव आहे. त्यामुळे रात्रपाळीत असलेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होते. एकूणच आपत्तीच्या काळात देवदूताप्रमाणे काम करणाऱ्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांवर धोकादायक इमारतीमुळेच आपत्ती कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. इमारतीची अवस्था पाहता या इमारतीची तत्काळ डागडुजी करणे गरजेचे आहे.

सबस्टेशनला मंजुरी

जालना शहरातील अग्निशमनच्या सबस्टेशन इमारतीला मंजुरी मिळाली आहे. जुन्या इमारतीची डागडुजी करण्यासही मंजुरी मिळाली आहे. प्रारंभी या इमारतीची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल.

नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, जालना

===Photopath===

200121\20jan_1_20012021_15.jpg~200121\20jan_2_20012021_15.jpg

===Caption===

कॅप्शन : जालना येथील अग्निशमन दलाची इमारत व दुसऱ्या छायाचित्रात इमारतीला आतील भागातून पडलेले भगदाड.  (20जेएनपीएच01 आणि 02)~कॅप्शन : जालना येथील अग्निशमन दलाची इमारत व दुसऱ्या छायाचित्रात इमारतीला आतील भागातून पडलेले भगदाड.  (20जेएनपीएच01 आणि 02)

Web Title: 'Disaster' at fire station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.