जालना शहरातील वाहतुकीला शिस्त लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:54 AM2018-05-15T00:54:18+5:302018-05-15T00:54:18+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमण हटाव व वाहतूक नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमण हटाव व वाहतूक नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.
नगरपालिकेत सोमवारी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, शहर अभियंता अशोक अग्रवाल, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बी. के. अंभोरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक घेण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पाणीवेस ते शिवाजी पुतळा, मुथा बिल्डिंग व्हाया लोखंडी पूल, मंमादेवी मस्तगड, मामा चौक ते वीर सावरकर चौक या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याचे पालन होत नसल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच सिंधीबाजार ते शोला चौक, गांधीचमन ते शनीमंदिर, मुक्तेश्वरद्वार, अशी एकेरी वाहतूक सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. शहरातील घरांसमोर व दुकानांसमोर बांधण्यात आलेल्या अनधिकृत ओट्यांमुळे रस्त्यावर वाहने उभी करण्यास अडचण निर्माण होते. नागरिक रस्त्यावर वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे निष्काशित करणे, तसेच पी -१, पी-२ वाहतूक नियमाची अमलबजावणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
या वेळी उपाध्यक्ष राऊत यांनी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना याबाबत दिलेल्या निवेदनाची प्रत मुख्याधिकाऱ्यांना दिली. बैठकीस विद्युत अभियंता अ. वा. माळवदकर यांच्यासह पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती.