कामचुकार अधिकाऱ्यांवरुन गाजली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:58 AM2019-08-14T00:58:03+5:302019-08-14T01:00:36+5:30
जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या फायली पुढच्या टेबलावर जात नाहीत, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या फायली पुढच्या टेबलावर जात नाहीत, अशा कामकुचार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांची उपस्थिती होती.
सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पुरात मरण पावलेल्यांना सभागृहाच्यावतीने श्रध्दाजंली वाहण्यात आली. त्यानंतर सदस्य जयमंगल जाधव यांनी जि.प. कार्यालयातील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्वच शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. पाण्याची टाकी गेल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेली नाही. तेच पाणी आपण सर्वजण पित आहोत. साफ-सफाई करण्यासाठी जिल्हा परिषदेने ३० लक्ष रुपये खर्च करुन फॉगिंग मशीन खरेदी केल्या. परंतु, त्या मशीन तशाच पडलेल्या आहेत. त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रशासनाने जि. प. कार्यालयाची साफ-सफाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोणतेही काम घेऊन गेले तर कर्मचारी टेबलावर दिसत नाही. सकाळी अकरा वाजता कर्मचारी येऊन सही करतात आणि निघून जातात. त्यांच्याकडे आलेल्या फाईली पुढच्या टेबलावर सरकतच नाहीत. त्यामुळे कामे पेंडींग पडत आहे. याकडे सीईओंनी लक्ष देवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना अध्यक्ष खोतकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच सीईओंनी पथक तयार करुन कर्मचा-यांची पाहणी केली. यात अनेक कर्मचारी गैरहजार आढळून आले, जे गैरहजार होते. त्यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्याचे ते म्हणाले. या सभेला सर्व विभागाचे सभापती, अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत उद्भवलेल्या पूर परिस्थितीत मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, तेथील सर्वसामान्यांसमोर अनेक प्रश्न उभा आहेत. ही बाब पाहता जालना शहरासह जिल्हाभरातील संस्था, संघटना, शाळकरी मुलांसह सर्वसामान्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. जालना जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने ही पूरग्रस्तांना जवळपास १ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात वनराई बंधारे तयार करणार
जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांतच जिल्हाभरात वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष खोतकर यांनी दिली. यासाठी सर्व ग्रामसेवकांना गावांची पाहणी करण्याचे आदेश दिले असल्याचे ते म्हणाले.