वीजबिलाच्या मुद्द्यावरून पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:52+5:302021-06-25T04:21:52+5:30
जालना : कोरोनाने हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीमागे वीज वितरण कंपनी हात धुवून मागे लागली आहे. जिल्ह्यातील अनेक ...
जालना : कोरोनाने हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीमागे वीज वितरण कंपनी हात धुवून मागे लागली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा वीजबिलांच्या मुद्द्यावरून खंडित केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन होते. यामुळे गावगाडा ठप्प झाला होता. निर्बंध शिथिल झाल्यावर लगेचच उत्पन्नाची साधने मुबलक नसताना वीज वितरण कंपनीने थकबाकी भरण्याचा आग्रह धरला आहे. सध्या शेतीमध्ये पेरणीची वेळ असून, पावसानेही हुलकावणी दिली आहे. अशामध्ये घनसांवगी तालुक्यातील अंतरवाली दाई, भुतेगाव, चापडगाव या गावाचा वीजपुरवठा गेल्या दाेन दिवसांपासून खंडित केला आहे.
असे असताना मार्चमध्येच अंतरवाली दाई येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येत १ लाख रुपयांची थकबाकी भरली होती. त्यानंतर दोनच महिन्यांनी पुन्हा वीज वितरण कंपनीने वीजबिल भरण्याचा तगादा लावला आहे. यासंदर्भात वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता आम्हाला वीजबिल वसुलीचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून आहेत. त्यामुळे आमचा नाईलाज असल्याचे सांगण्यात आले. काही शेतकऱ्यांनी आपली व्यथा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे मांडली, पंरतु यात पाहिजे तेवढे लक्ष न घातल्याने नाराजी व्यक्त होत आहे.