दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्ज प्रस्तावाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:52 AM2019-01-16T00:52:46+5:302019-01-16T00:54:44+5:30
तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदा जिल्ह्यातील ७५ दिव्यांगांना राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातर्फे (मुंबई) अल्प व्याजदरात कर्ज देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदा जिल्ह्यातील ७५ दिव्यांगांना राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातर्फे (मुंबई) अल्प व्याजदरात कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी जिल्हा कार्यालय दिव्यांग महामंडळाकडून, फॉर्मचे वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती वसुली अधिकारी कृष्णा जाधव यांनी दिली आहे.
या संदर्भात लोकमतने ७ जानेवारीला दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिव्यांगांना मिळणार कर्ज या मथळ््याखाली वृत्त छापले होते. याची दखल घेत समाज कार्यालयाकडून फॉमचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे अनेक दिव्यांगांनी लोकमतचे आभार मानले आहे.
दिव्यांगांची बेरोजगारीतून मुक्तता व्हावी, त्यांना स्वत:च्या पायावर उभा राहता यावे, यासाठी सन २००३ पासून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळा कडून अल्प व्याजदरात कर्ज वितरीत केल्या जात आहे. सन २००३ पासून २०१६ पर्यंत १ हजार १०० दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना जवळपास पावने सहा कोटी रूपयांचे वाटप शासनातर्फे करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यंदा सन २०१८- १९ साठी शासनाने जिल्हा कार्यालयाला ७५ जणांना कर्ज वितरित करण्याचे उद्दीष्टे दिले होते. त्यामुळे सोमवारी कार्यालयातर्फे कर्जाचे फॉर्म वितरित करण्यात आले आहे. यावेळी दिव्यांग व्यक्तींनी कर्जाचे फॉम घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, शासनाने कार्यालयाला ७५ फॉम दिले होते. यामुळे प्रथम आलेल्या नागरिकांनाच फॉर्म देताना प्राधान्य देण्यात आले आहे.
फॉर्म दिलेल्यांकडून सात ते आठ दिवसात कागदपत्रांसह फॉर्म भरून घेतले जाणार असून कागदपत्रांची तपासणी करून अर्जाचे प्रस्ताव जालना जिल्हा कार्यालयाकडून मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
लाभार्थी : कागदपत्रे लागणार
कर्ज देण्यासाठी या दिव्यांग व्यक्तीकडे ४० टक्यापेक्षा अधिकचे दिव्यांग प्रमाणपत्र हवे आहे. लाभार्थी १८ ते ६० वयोगटातील असून वयाचा दाखला, मतदान कार्ड, आधार कार्ड, प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रे लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे.