दोन महिन्यानंतर लाभले जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:49 AM2018-06-12T00:49:19+5:302018-06-12T00:49:19+5:30
दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जालना जिल्हाधिकारी पदावर सोमवारी रवींद्र बिनवडे हे रूजू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जालना जिल्हाधिकारी पदावर सोमवारी रवींद्र बिनवडे हे रूजू झाले. रूजू झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, शासनाने जो प्राधान्यक्रम ठरवला आहे, त्यानुसार काम करणार असून, सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यावरही माझा भर राहील असेही ते म्हणाले.
आपण मुळचे मराठवाड्यातील असल्याने येथील जवळपास सर्वच परिस्थितीची माहिती आहे. यापूर्वी नंदूरबार येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पदावर असताना अनेक कामे केली आहेत. त्यात जलयुक्त शिवार योजनेला आपले प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी म्हणून आपली ही पहिलीच पोस्टींग असल्याने प्रथम आपण जिल्ह्यातील सर्व विभागांची माहिती घेऊन दौरा करणार आहोत. त्यानंतर कुठल्या बाबीला प्राधान्य द्यायचे हे ठरवू असे ते म्हणाले.
प्रशासकीय यंत्रणेत आलेली मरगळ दूर करणे यालाही आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच नेमका फोकस कोणत्या कामावर राहणार या बाबत मात्र, लगेचच सांगणे योग्य ठरणार नसल्याने त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या वतीने नगराध्यक्षांकडून स्वागत
नूतन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे स्वागत जालना नगर पालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, नगरसेवक रमेश गौरक्षक, अॅड. राहुल हिवराळे यांच्यासह अन्य नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि जिल्हाधिकारी यांच्या शहरातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.