परतूर येथील जिल्हा बँकेच्या शाखेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:06 AM2020-02-08T00:06:12+5:302020-02-08T00:09:16+5:30
परतूर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटप करण्यासाठी बँकेत पैसे उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. ...
परतूर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटप करण्यासाठी बँकेत पैसे उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून, शेतक-यांनी यावेळी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरत काम बंद पाडले होते.
परतूर शहरतील मोंढा भागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. सध्या या शाखेतून शेतक-यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप सुरू आहे. या बँकेत शुक्रवारी दुपारी रोहीना (खर्दु) व रोहिणा (बु.) या दोन्ही गावातील शेतकºयांना अनुदान वाटप केले जाणार होते. त्यामुळे अनुदान उचलण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. मात्र, वाटपासाठी बँकेत पैसेच नसल्याने आलेल्या खातेदार शेतक-यांनी गोंधळ घालत बँकेचे शटर खाली ओढून कामकाज बंद पाडले. हा गोंधळ अर्धा तास सुरू होता. नंतर शाखा व्यवस्थापकांनी बँकेच्या सरव्यवस्थापकांना बोलावून घेतले. त्यांनी सोमवारी पैसे उपलब्ध होतील त्यानंतर खातेदारांचे अनुदान वितरीत करण्यात येईल असे सांगितल्यानंतर हा गोंधळ थांबला. या बँकेस जालना येथील मध्यवर्ती बँकेकडून पैसे उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र मुख्य शाखेतच पैसे नसल्याने परतूर शाखेस पैसे मिळाले नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी वाटप
पैसे नसल्याने शाखेत अर्धा तास गोंधळ झाला. एकत्रित आलेली दोन गावे आणि ६०० खातेदार होते. त्यांना ४६ लाख रूपये वाटप करायचे होते. इतकी रक्कम शाखेत नसल्याने अनुदान वाटपात अडचण आली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. सोमवारी पैसे उपलब्ध होणार असून, पैसे उपलब्ध झाल्यानंतरच शेतक-यांना अनुदान वाटप केले जाणार आहे.
- ए. एच. काऊतकर, शाखा व्यवस्थापक, परतूर