वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:50 AM2019-04-20T00:50:42+5:302019-04-20T00:51:42+5:30
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. नेते निवडणुकीत गुंतल्याने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्याने जनता हैराण झाली आहे.
जालना शहरात गेल्या आठवडाभरात कधी वादळी वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस यामुळे ‘बत्ती गुल’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वा-यामुळे तर संपूर्ण शहर हे पाच तास अंधारात होते. पावसाळापूर्व देखभाल दुरूस्ती ही दरवर्षी केली जाते, त्यावर संबंधित कंत्राटदाराला लाखो रूपयांची देयके अदा करण्यात येतात. असे असताना देखील विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच संभाजीनगरमध्ये असेच तारांवर झाड कोसळल्याने मोठा विलंब झाला होता. एकूणच वीज पुरवठ्याकडे ना वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ना प्रशासकीय अधिका-यांचे लक्ष आहे.
कोणाचाच वचक राहिला नाही
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जे कॉल सेंटर आहेत, तेथील दूरध्वनी हे बाजूला काढून ठेवण्याचे अनेक प्रकार सर्रासपणे घडतात. वीजपुरवठा खंडित होऊन तो पुन्हा कधी पूर्ववत होईल, याची माहिती विचारण्यासाठी वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याने देखील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी ज्या प्रमाणे लक्ष दिले जाते, त्या धर्तीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकडेही तेवढेच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.