पालखी मार्गावरील खड्डे बुजवले, सुविधांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:02 AM2019-07-11T01:02:25+5:302019-07-11T01:02:36+5:30
शहराचे कुलदैवत आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मार्गावरील खड्डे पालिका प्रशासनाने बुजविले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहराचे कुलदैवत आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मार्गावरील खड्डे पालिका प्रशासनाने बुजविले आहेत. पालखी मार्ग आणि आनंदी स्वामी मंदिर परिसरातील व्यवस्थेची माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
आषाढी एकादशी निमित्त शहरातून आनंदी स्वामींची पालखी निघते. यंदा आषाढी एकादशीनिमित्त आनंदी स्वामींची शुक्रवारी शहरातून पालखी निघणार आहे. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या सूचनेनंतर पालिका प्रशासनाने पालखी मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी केली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पालखी मार्गासह आनंदी स्वामी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.