उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन
By विजय मुंडे | Published: September 8, 2023 01:00 PM2023-09-08T13:00:14+5:302023-09-08T13:02:55+5:30
लोकशाही मार्गाने लढा द्यावा; शासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत.
वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची बाजी लावून अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये, आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. गुन्हे दाखल झाले तर शिक्षणाला आणि नोकरीला अडचण येईल. सर्वांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
मराठा समाजाला कुणबी दाखला द्यावा यासाठी जरांगे आणि त्यांचे सहकारी अंतरवाली सराटी गावात अमरण उपोषण करीत आहेत. या उपोषणाच्या दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात आंदोलन सुरू झाले आहे. परंतु काही ठिकाणी हिंसक प्रकारे आंदोलन केले जात असल्याचे दिसून येत आहे. काहींनी आत्महत्या करणे यासह इतर टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील युवकांचे भविष्य घडवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. युवकांनी असे केले तर त्याचा फायदा कोणाला होणार असा सवाल करीत युवकांनी शांततेत आंदोलन करावे, लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अन्यथा पाणी त्याग, उपचार बंद
शासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत. काल रात्रीपासून पिशवी भरून तयारीत आहोत. परंतु अद्याप शासनाचा काही निरोप आलेला नाही. आम्ही शासनाला चार दिवसांची मुदत दिली आहे. चार दिवसानंतर मात्र योग्य निर्णय न झाल्यास पाणी त्याग आणि उपचार बंद ही भूमिका कायम राहणार आहे.