शिकलेली माणसंच भेद करतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:30 AM2019-02-15T00:30:56+5:302019-02-15T00:31:13+5:30
जाती पातीच्या भिंती पाडून सर्वांनी एकदिलाने एकत्र येऊन सुखाने नांदावे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी येथे बोलताना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प. पू. मन्मथ स्वामींनी कधीच जात- पात मानली नाही, अशा प्रकारचा भेदा-भेद त्यांना कदापिही मान्य नव्हता. म्हणूनच अनेक प्रकारच्या रचना त्यांनी लिहून हा भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज माणसं आप- पर असा भेद करु लागली आहेत. फाटक्या- तुटक्यांचं सोडा, परंतु शिकली सवरलेली माणसंच अशा प्रकारचा भेद निर्माण करण्यात सर्वात पुढे आहेत. मात्र जाती पातीच्या भिंती पाडून सर्वांनी एकदिलाने एकत्र येऊन सुखाने नांदावे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी येथे बोलताना दिला.
अंबड रोडवरील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिर परिसरात अखंड शिवनाम सप्ताहातील संगीतमय शिवकथेचे चौथे पुष्प गुंफताना कस्तुरे महाराज बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, संतांकडे विवेक बुध्दी होती. आपण विवेक गहाण तर टाकला नाही, अशी शंका येऊ लागली आहे. ज्यांच्याकडे विवेकपूर्ण बुध्दी आहे. ती माणसं आजही सुखाचा संसार करतात आणि जे संसारात सुखी आहेत, तेच परमार्थ चांगला करतात. फुकट काहीही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी श्रम करावे लागतात. स्वातंत्र्य देखील फुकट मिळालेलं नाही. तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूँंगा, असं सुभाषचंद्र बोस म्हणाले होते. देवही फुकट मिळत नाही किंवा भेटत नाही. फरक एवढाच की देवाला प्राप्त करुन घेण्यासाठी पैसा लागत नाही. देव आप- पर असा भेद करत नाही. तो फाटक्या- तुटक्यांसाठी जसा आहे तसा तो पैसेवाल्यांसाठीही आहे. मात्र तुम्ही किती श्रीमंत, तुमच्या अंगावर किती भारी कपडे आहेत, हेही देव पाहात नाही. देव फक्त भक्तीचा भुकेलेला आहे. जन्मभरीच्या श्वासाइतके घेतले हरिनाम.. बाई मी विकत घेतला शाम... हे भक्तीही महाराजांनी आपल्या पहाडी आणि भारदस्त आवाजात गाऊन दाखवले.
जेथे भेद येतो, तेथे दु:खही येते. आपल्या पुत्रासाठी कैकयी मातेने जे जग जाहीर केले त्याने संपूर्ण अयोध्यानगरी दु:खात बुडून गेली. मात्र, भरताने कधीही गादीचा हव्यास केला नाही. चौदा वर्षे त्याने रामाच्या पादुकांची पूजा केली. हा त्याग भरताकडे होता. म्हणून त्याला दु:खाने वेढले नाही. इकडे कैकयीची इच्छापूर्ती होऊनही ती दु:खाने व्यापून गेलेली होती. अर्थात भेद आला की दु:ख येतेच, असे कस्तुरे म्हणाले.
बायका कधीही घर फोडत नाहीत. त्यांच्यावर नको तो आरोप करण्यात येतो. बायकांनी घरे फोडली असती तर भरतानं राजगादीचा त्याग केला असता का ? जोपर्यंत माणसं खंबीरपणे भूमिकेवर ठाम असतात, तोपर्यंत बायकांनीही काहीही सांगू द्या, काहीही होत नाही.
माणसं आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत म्हणून बायका घर फोडतात, असे म्हटले जाते. मात्र त्यात तथ्य नाही. असल्या फालतू भानगडीत वेळ घालवण्यापेक्षा चांगली स्वप्ने पाहा. स्वप्ने पाहण्यासाठी पैसा लागत नाही. मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, तो मुख्यमंत्री- पंतप्रधान झाला पाहिजे, अशी स्वप्ने बघा.