मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्याचे तोडले लचके; आई अन् आजी धावून आल्याने वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 03:34 PM2021-12-30T15:34:43+5:302021-12-30T15:35:01+5:30
या कुत्र्यांच्या चाव्याने धायमोकलून रडणाऱ्या मुलाचा आवाज ऐकून घरातून मुलाची आई आणि आजी या धावत घराबाहेर आल्या.
जालना : शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. रात्री रस्त्यावरून जीव मुठीत धरूनच जावे लागते. याच श्वानांच्या दहशतीच्या तावडीत जुना जालना भागातील समर्थनगरमधील रहिवासी साईराज राहुल डफडे (३) हा सापडला. मात्र, आई अन् आजीने जिवाची पर्वा न करता कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या साईराजला सोडवले व त्याला रुग्णालयात नेल्याने त्याचे प्राण वाचले.
बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास साईराज हा समर्थनगरधील त्यांच्या घरासमोरील अंगणात खेळत होता. याचदरम्यान चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या गालाचे, तसेच पायाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. या कुत्र्यांच्या चाव्याने धायमोकलून रडणाऱ्या मुलाचा आवाज ऐकून घरातून मुलाची आई आणि आजी या धावत घराबाहेर आल्या. त्यांनी जिवाची पर्वा न करता त्या कुत्र्यांच्या तावडीतून साईराजला सोडवून थेट जिल्हा रुग्णालय गाठले. तोपर्यंत साईराजला तीन ते चार ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. त्याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कुत्र्यांची संख्या वाढल्याने दहशत
जालना शहरात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच मांसाहरी दुकानांच्या समोर कुत्र्यांचा घोळकाच असतो. त्यामुळे ही दुकाने हटवावीत अशी मागणी वेळोवेळी या भागाचे नगरसेवक शशिकांत घुगे यांनी केली होती. याबद्दलचा मुद्दा त्यांनी पालिकेच्या सभेतही मांडला होता. परंतु, त्याकडे दर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आज दैव बलवत्तर म्हणून तीन वर्षाच्या साईराज डफडेचे प्राण वाचल्याचे नगरसेवक घुगे यांनी सांगितले.