मोकाट कुत्रे दररोज दहा जणांचे तोडतात लचके !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:07 AM2020-02-13T01:07:00+5:302020-02-13T01:07:44+5:30
उद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या जालना शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या जालना शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. दररोज एक, दोन नव्हे तब्बल दहा ते बारा जणांचे लचके हे मोकाट कुत्रे तोडत आहेत. मोकाट कुत्र्यांमुळे शहरवासिय हैराण झालेले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची चर्चा केवळ पालिकेच्या सभागृहात होते. नंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकही चिडीचूप राहत असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना शहरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल सोयरसुतक नसल्याचे दुर्दैवी चित्र मागील अनेक वर्षांपासून दिसत आहे.
जालना शहरातील मुख्य मार्ग असो, बाजारपेठ असो किंवा गल्ली- बोळातील रस्ते असोत; मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरे दिसले नाही तर नवलच! दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मागे धावणारे कुत्रे असोत किंवा बाजारपेठ, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात फिरणारी मोकाट जनावरे असोत; यामुळे शहरवासीय चांगलेच हैराण झाले आहेत. जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करावे, हा मुद्दा केवळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सतत चर्चिला जातो. विरोधक पोटतिडकीने मुद्दा मांडतात. सत्ताधारी निर्बिजिकरणाचे आश्वासन देतात आणि अधिकारी कार्यवाही करण्याचे वचन देतात. मात्र, ही प्रक्रिया केवळ सभागृहातील चर्चेपुरतीच मर्यादित राहत असल्याचे वास्तव आहे.
जालना येथील जिल्हा रूग्णालयात मागील २१ दिवसांत कुत्र्याने चावा घेतलेले एक दोन नव्हे तर तब्बल २२५ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यात २० ते २६ जानेवारी या कालावधीत ७१ जणांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतले आहेत. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ७९ जणांनी तर ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत मोकाट कुत्रे चावलेल्या ७५ जणांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतले आहेत. केवळ सरकारी रुग्णालयातील ही आकडेवारी असून, खाजगी रूग्णालयात उपचार घेणाºयांची संख्या वेगळीच आहे. यातील बहुतांश रूग्ण हे शहरातील असून, ग्रामीण भागातून येणा-या रूग्णांची संख्या कमीच आहे.
विशेषत: मागील अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. मात्र, मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेले नगर पालिका प्रशासन, विरोधक मात्र, याकडे नेहमीच कानाडोळा करीत आले आहेत.
मोकाट जनावरांविरूध्दची कारवाई मोहीमही गुंडाळली
शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्ग, अंतर्गत भागात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. शाळा, महाविद्यालयाच्या आवारातही ही मोकाट जनावरे फिरत असून, याचा शाळकरी मुलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा भर रस्त्यात जनावरे बसत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या जनावरांविरूध्द वाहतूक शाखा व पालिकेने सुरू केलेली संयुक्त कारवाईची मोहीमही गुंडाळण्यात आली आहे.