विठ्ठल मंदिरातील दानपेटी पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:13 AM2018-04-27T01:13:59+5:302018-04-27T01:13:59+5:30
जुना जालन्यातील कसबा परिसरातल्या अत्यंत वर्दळीच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील दानपेटी दोन जणांनी पळवली. यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालन्यातील कसबा परिसरातल्या अत्यंत वर्दळीच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील दानपेटी दोन जणांनी पळवली. यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास लक्कडकोट परिसरात गस्तीवर असताना विठ्ठल मंदिराजवळ अंधारात दोघे जण संशयितरीत्या उभे असलेले दिसले. पोलिसांनी गाडी थांबवताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील एकास गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव सत्तार गफार खान (२२, रा. माळीपुरा) असे सांगितले. पळून गेलेला साथीदार संशयित उशेद उर्फ जंगली नासेर खान याच्या मदतीने विठ्ठल मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील दानपेटी चोरल्याचे सांगितले. दानपेटी जंगली घेवून पळाल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. एका घराच्या भिंतीवरून उडी मारल्याने त्याचा पाय मोडला. पोलिसांनी त्याच्याकडील लोखंडी टॉमी जप्त केली. जुन्या नगरपालिका कार्यालय परिसरात शोधाशोध केली असता, रस्त्यालगत दानपेटी फेकलेली आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून दानपेटी ताब्यात घेतली. पेटीत पाच हजार ३०० रुपये आढळून आले. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात सत्तार खा याच्यासह जंगली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पाठलाग करत असताना जंगलीने मस्तगड परिसरातील एका घराच्या भिंतीवरून उडी मारली. त्यामुळे त्याचा पाय मोडला. तरीही पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान, या प्रकरणात पालिकेच्या एका सदस्याचा नातेवाइक असलेल्या एकास पकडून नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र, चौकशीत त्याचा प्रकरणाची संबंध नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यास सोडून दिले.