आरक्षण मिळेपर्यंत पक्षाला अन् नेत्याला जातीपेक्षा मोठे माणू नका-मनोज जरांगे पाटील
By विजय मुंडे | Published: December 21, 2023 10:08 PM2023-12-21T22:08:53+5:302023-12-21T22:09:00+5:30
'मराठ्यांनो आरक्षणासाठी आपापसातील वैर संपवा.'
विजय मुंडे
जालना : मी तुमच्या बळावर लढत आहे. मी मरायला भीत नाही. तुम्ही राजकारणामुळे आपापसात वैर करू नका. आरक्षण मिळेपर्यंत पक्षाला अन् नेत्याला जातीपेक्षा मोठे माणू नका. इतर समाजाचा आदर्श घेवून एकमेकांना पुढे घेवून चालायचे शिका, अशी साद मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना घातली.
बदनापूर येथे गुरूवारी रात्री आयोजित सभेत जरांगे पाटील बोलत होते. आज आरक्षणासाठी मराठा समाज एकत्र आला आहे. २४ डिसेंबरपर्यंत शासनाने वेळ घेतला आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर अधिवेशनाची मुदत वाढवा. विशेष अधिवेशन बोलाविण्याचा घाट घालू नका, अशी मागणी होती. कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. शिंदे समितीने दोन अहवाल दिले आहेत. ५४ लाख नोंदी मिळालेल्या आहेत. मग अडचण काय? ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी निकष पार केले आहेत. मग अडचण काय ? उपोषण सोडताना चार शब्द लिहून घेतले. परंतु, दोनच शब्द विधीमंडळाच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी मांडले.
१९६७ पूर्वीची ज्याची नाेंद सापडली त्याच्या सर्व परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल. ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना लाभ मिळेल, असे दोन शब्द घेतले आणि दोन घेतलेच नाहीत. खरी खुट्टीच तिथेच आहे. त्या दोन शब्दांचे स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा २३ तारखेला काय निर्णय घ्यायचा तो आपण घेवू. मराठा बांधवांनी आरक्षण मिळेपर्यंत पक्षाला अन् नेत्यांना जातीपेक्षा मोठे माणू नये. राजकारणासाठी आपापल्यात वैर निर्माण करू नका. व्यसनांपासून दूर रहा, एकमेकांचे बांध टोकरायचे बंद करा, आपापसातील वैर संपवा. एकदा आरक्षण मिळाले तर लेकरांच्या आयुष्याचे कल्याण होईल, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.