आशेवर राहू नका, मुंबईला जायचे म्हणजे जायचे; बच्चू कडू यांच्या भेटीनंतरही जरांगे पाटील ठाम
By विजय मुंडे | Published: January 15, 2024 12:11 PM2024-01-15T12:11:27+5:302024-01-15T12:12:36+5:30
बच्चू कडू यांचा मनोज जरांगेंसोबत संवाद; जरांगे पाटील यांनी सूचविले अध्यादेशातील बदल
जालना : नोंदी सापडलेल्यांच्या सग्या-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, याबाबत आ. बच्चू कडू यांच्या मार्फत काही बदल शासनाला सूचविले आहेत. असे असले तरी वेळकाढूणा होवू शकतो. समाज बांधवांनी आशेवर राहू नये, २० जानेवारीला मुंबईला जायचे म्हणजे जायचेच आहे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
शासनाच्या वतीने नव्याने काढण्यात येणाऱ्या अध्यादेशाबाबत आ. बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांची यादी १६ ते १७ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतींवर लावावी, सगे सोयऱ्यांबाबत जे लिहून दिले ते शासनाकडे सादर करू त्यावर काय तोडगा निघेल यावर पाहू. मुळात प्रशासन हे मोठी अडचण आहे. त्याला वठणीवर आणून काम करून घेणे गरजेचे आहे. १८ ते १९ जानेवारीस जी अधिसूचना निघतेय त्यात त्र्यंबकेश्वर, राक्षसभुवन, लसीकरणाच्या नोंदी त्या अधिसूचनेत आल्या तर अधिक सोपे होईल, यावर मुख्यमंत्र्यांची यांची भेट घेवू. काय तोडगा निघतेय ते पाहू त्यांचे प्रत्येक शब्द घेवून चर्चा करू असे आ. बच्चू कडू म्हणाले.
ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र वितरित करावे, ग्रामपंचायतींना यादी लावावी, सगेसोयरे शब्दा आणि मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे यावर चर्चा झाली. सापडलेल्या नोंदी ज्या जतन करून ठेवा, ३३/३४ गाव नमुना नोंदी घेणे, १४ नंबर, दैवतांच्या संस्थानच्या नोंदींवर चर्चा झाली. केवळ चर्चा नव्हे तर २० तारखेच्या आत हे सर्व करून शासन निर्णय किंवा कायदा पारित करावा, असे सांगितले आहे. चर्चा सुरू राहतील. वेळकाढूपणा होवू शकतो. त्यामुळे काहीही होवो २० जानेवारीला मुंबईत जायचे म्हणजे जायचे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
२० नंतर मी आंदोलनात: बच्चू कडू
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपणही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. अधिवेशनातही आवाज उठविला आहे. शासन प्रतिनिधी म्हणून आज आलो असलो तरी २० तारखेपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मी स्वत: आंदोलनात उतरणार असल्याची भूमिका आ. बच्चू कडू यांनी यावेळी जाहीर केली.