'पोलिसांना जिवंत जाऊ देऊ नका'; जुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना मारहाण
By दिपक ढोले | Published: June 8, 2023 05:53 PM2023-06-08T17:53:42+5:302023-06-08T17:55:19+5:30
सात ते आठ ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यांनी पोलिसांना मारेकऱ्यांच्या तावडीतून सोडले.
जालना : परतूर तालुक्यातील रंगोपंत टाकळी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या सहायक पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून काठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी संशयित अनिल मधुकर ठोंबरे, कैलास उध्दव ठोंबरे, ऋषिकेश भाऊसाहेब ठोंबरे, शाम बाबादेव ठोंबरे, भाऊसाहेब महादेव ठोंबरे, उध्दव श्रीरंग ठोंबरे (सर्व रा. रंगोपंत टाकळी, ता. परतूर ) अन्य चार अनोळखी व्यक्तींविरुध्द आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंगोपंत टाकळी येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके यांना मिळाली. या माहितीवरून सपोनि. सोमनाथ नरके, पोलिस कॉन्स्टेबल दीपक सोनूने, राणोजी पांढरे, सज्जन काकडे यांच्यासह दोन पंच दुचाकीने सदर ठिकाणी बुधवारी रात्री गेले. रंगोपंत टाकळी येथील शेताच्या बाजूला मोकळ्या जागेवर काही जण जुगार खेळताना दिसून आले. पोलिसांना पाहताच, तीन ते चार जणांनी पळ काढला. तर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच वेळी संशयित अनिल ठोंबरे, कैलास ठोंबरे, ऋषिकेश ठोंबरे, शाम ठोंबरे, भाऊसाहेब ठोंबरे व उध्दव ठोंबरे हे तेथे आले. तुम्ही माझे चुलते उध्दव ठोंबरे यांना सोडून द्या, असे अनिल ठोंबरे म्हणाला. नंतर सपोनि. सोमनाथ नरके हे अनिल ठोंबरेला समजावून सांगत असताना, सर्व आरोपींनी हुज्जत घातली.
पोलिसांना जिवंत सोडू नका, असे म्हणून शिवीगाळ करून काठ्यांनी मारहाण केली. अनोळखी चार इसमांनीही पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यात सपोनि. नरके, कर्मचारी सोनुने, पांढरे, काकडे हे जखमी झाले आहेत. त्याचवेळी सात ते आठ ग्रामस्थ धावून आले. त्यांनी पोलिसांना संशयितांच्या तावडीतून सोडले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दीपक सोनूने यांच्या फिर्यादीवरून संशयित अनिल ठोंबरे, कैलास ठोंबरे, ऋषिकेश ठोंबरे, शाम ठोंबरे, भाऊसाहेब ठोंबरे, उध्दव ठोंबरे यांच्यासह अनोळखी चार जण अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके हे करीत आहेत.
पोलिसांना जिवंत जाऊ देऊ नका
जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी आष्टी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. तेथे काही जणांनी हुज्जत घालून पोलिसांना जिवंत जाऊ देऊ नका, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील एक आरोपी अटकेत असून, बाकी सर्व आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.