दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरु नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:49 AM2021-05-05T04:49:15+5:302021-05-05T04:49:15+5:30
जालना जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला होता. त्यातील ग्रामीण आणि शहरी अशा एकूण १०२ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. ...
जालना जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला होता. त्यातील ग्रामीण आणि शहरी अशा एकूण १०२ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. या चार महिन्यात दोन लाख नागरिकांनी लस घेतली. परंतु ही लस घेताना मोठा गोंधळ उडाला आहे. ज्यांना पहिला डोस दिला, त्यांच्यासाठी दुसरा डोस राखून ठेवणे आवश्यक होते. परंतु तसे न करता जो येईल त्याला ही लस देत गेल्याने दुसरा डोस पुरविताना आता मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, यामुळे विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप होत आहे.
ग्रामीणमध्ये तर आता एक डोस घेतला आणि दुसरा मिळत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरी भागात मात्र, नागरिक सळो की पळो करून सोडत आहेत.
दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा
दुसरा डोस घेण्यासाठी सरासरी २८ दिवस थांबावे असे निकष होते. परंतु जास्तीत जास्त ४५ दिवस थांबता येते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पहिला आणि दुसरा असे दोन डोस घेतल्यावर तुमच्या प्रतिकारशक्तीत मोठी वाढ होते. यामुळे कोरोना झाल्यावरही तो पाहिजे तेवढा हानिकारक ठरत नाही.
डोसला उशीर झाला तरी घाबरु नका
कोरोनावर ज्या दोन कंपन्यांच्या लसी बाजारात आहेत, त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु पहिला डोस घेतल्यानंतरची मुदत संपल्यावर चिंता व्यक्त होत आहे. परंतु तज्ज्ञ डॉ. संजय जगताप यांनी सांगितले की, २८ दिवस ही एक ढोबळ मुदत होती. परंतु साधारपणे पंधरा ते वीस दिवस उलटून गेल्यावरही घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले.