"कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गरीब मराठ्यांचे"; गॅझेट अंमलबजावणीवर जरांगे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 03:27 PM2024-09-14T15:27:08+5:302024-09-14T15:28:31+5:30
हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट हा विषय काही नवीन नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत.
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): राज्यातील मराठा समाजाने आपला हक्क मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे. "कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गोरगरीब मराठ्यांचेच आहे," अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचालीवर घेतली. ते म्हणाले, हैद्राबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवर बोलताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, या गॅझेटचे श्रेय फक्त गोरगरीब मराठ्यांचे आहे आणि हे यश देखील त्यांचेच आहे. तसेच त्यांनी जोरदार इशारा दिला की, मुख्यमंत्र्यांनी, छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री व खासदारांनी मराठा समाजाच्या अपेक्षांशी दगा फटका करू नये. ते अंतरवाली सराटी येथे आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट हा विषय काही नवीन नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत यावर जरांगे म्हणाले. ''या हालचाली ३ महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या होत्या आणि आम्ही यावर आधीपासूनच लक्ष ठेवले आहे," असे ते म्हणाले. या गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे सर्व मराठ्यांना मोठा फायदा होणार आहे. शंभूराज देसाई तीन महिन्यांपासून यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु मराठा समाज एवढ्यावर थांबणार नाही. "आम्हाला केवळ आश्वासन नको आहे, आम्हाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर सोमवारी रात्री १२ वाजेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला.
राज्यात दंगली झाल्या तर फडणीस-भुजबळ जबाबदार
मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "फडणवीस साहेबांना राज्यात रक्तपात घडवायचा आहे आणि मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. जर राज्यात काही दंगे झाले, तर त्यासाठी फडणवीस आणि भुजबळ जबाबदार असतील."
प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार
मराठा आरक्षणाबाबत राज्यात सुरू असलेल्या विविध आंदोलने आणि त्यांच्यावर होणाऱ्या राजकीय हालचालींवर जरांगे पाटील म्हणाले, "राज्यात कोणालाही आंदोलनाचा अधिकार आहे, परंतु माझ्या मराठ्यांना खरचटले देखील नाही पाहिजे." आमच्या मराठ्यांना गाल बोट लागता कामा नये असे स्पष्ट करत जरांगे यांनी शासनाने राजेश्री उंबरे यांना काय आश्वासन दिलय ते त्यांनाच माहिती असे भाष्य केले. तसेच लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणावर भाष्य करताना जरांगे म्हणाले की, उपोषण हा प्रत्येकाचा अधिकार आहे.