होणाऱ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय; मोबाईल गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आला अन् खून केला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:46 AM2023-02-25T11:46:54+5:302023-02-25T11:51:04+5:30
तरुण साखरपुड्यानंतर घ्यायचा मुलीच्या चारित्र्यावर संशय
जालना : मंठा तालुक्यातील बेलोरा येथील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा खून करण्यापूर्वी संशयित सुशील पवार याने मोबाईल गिफ्ट दिला. नंतर चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला. लगेच तिच्या अंगावर बसून गळा दाबत चाकूने वार करून खून केला. तेथून थेट अहमदाबाद गाठले. तेथे काम न मिळाल्याने तो परत मुंबईकडे आला. त्याचवेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम यांनी दिली.
बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (१७) हिचा मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. त्यांचा साखरपुडाही झाला. नंतर दोघे एकमेकांना फोनवर बोलत होते. त्याचवेळी सपनाच्या चारित्र्यावर सुशील संशय घेऊ लागला. पुढे हा संशय वाढत गेला. विवाह १७ मार्च रोजी असल्याने १८ फेब्रुवारी रोजी वधू आणि वर पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. हीच संधी साधून सुशीलने नातेवाईकांना खोटे सांगून थेट बेलोरा गाव गाठले.
कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. त्याने तिला मोबाईल गिफ्ट दिला. तिच्यावर अत्याचार केला. नंतर चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वादावादी झाली. तिच्या अंगावर बसून त्याने गळा दाबला. त्यानंतर धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तेथून सुशील गावाकडे निघाला. त्याचवेळी त्याची दुचाकी पिठाच्या गिरणीला धडकली. त्याला गावातील दोघांनी बघितले होते. दुचाकी चांगेफळ शिवारात सोडून तो सिंदखेडराजा येथे आला. तेथून त्याने खासगी बसने थेट पुणे गाठले. तेथे मित्रांना भेटून मुंबईला गेला. मुंबईहून रेल्वेने अहमदाबादला जात तेथे त्याने काम पाहिले. परंतु, त्याला काम मिळाले नाही. त्यामुळे तो परत माघारी मुंबईकडे निघाला. त्याचवेळी त्याने मोबाईल फेकून दिला. मुंबईत येताच, त्याला पोलिसांनी अटक केली.
आत्महत्या केल्याचा बनाव
पोलिसांनी सुशील पवार याला अटक करून विचारपूस केली असता, त्याने सपनाने आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिस खाक्या दाखविताच, त्याने खून केल्याची कबुली दिली. त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम यांनी दिली.