जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे जुन्या जालन्यात निर्जळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:24 AM2020-01-02T01:24:03+5:302020-01-02T01:24:21+5:30
जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेची औरंगाबाद- पैठण, पैठण- पाचोड या मार्गावर होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी जालना पालिकेतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेची औरंगाबाद- पैठण, पैठण- पाचोड या मार्गावर होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी जालना पालिकेतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
यामूळे जुना जालना भागाला ५ जानेवारीपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही, याची नोंद घेऊन जुना जालना वासियांनी नगर पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद- पैठण रोडवरील पावन गणपती मंदिर, पैठण- पाचोड रोडवरील जिंनिंग कारखान्याजवळ तसेच पैठण- पाचोड रोडवर असलेल्या शेख मोमीन यांच्या शेताजवळ आणि डाबरवाडी गुलाबबाबा आश्रमाजवळ जालना शहराला पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी- जालना जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. आगामी कालावधीत उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन आणि जालनेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून जालना नगर पालिकेतर्फे आताच ही काळजी घेतली जात असल्याचे गोरंट्याल तसेच मुख्याधिकारी नार्वेकर यांनी नमूद केले आहे.