रुग्णसेवा करण्यासाठी परिचारिका होण्याचे स्वप्न पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:46 AM2019-05-12T00:46:58+5:302019-05-12T00:47:41+5:30

अंजुनिका घोरपडे यांनी मावशीकडे गेल्यानंतर तेथील रुग्णसेवेचे महत्त्व जाणून घेतले आणि परिचारिका होण्याचा मनोमन निर्णय केला.

The dream of becoming a nurse for patient care is complete | रुग्णसेवा करण्यासाठी परिचारिका होण्याचे स्वप्न पूर्णत्वास

रुग्णसेवा करण्यासाठी परिचारिका होण्याचे स्वप्न पूर्णत्वास

Next

नसीम शेख
टेंभुर्णी : माझी मावशी नर्स असल्या कारणाने अनेकदा तिच्यासोबत रुग्णालयात जायचे. परिचारिकेच्या सेवेतील रुग्णसेवेचा सेवाभाव पाहून बालपणीच मी नर्स होण्याचे मनोमन ठरवले होते. ईश्वराने माझी ती इच्छा पूर्ण केली. १९९६ पासून मी शासकीय रूग्णालय सोलापूर येथून सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल जालना, परभणी येथे कर्तव्य बजावल्यानंतर मागील ३ वर्षापासून ग्रामीण रूग्णालय टेंभुर्णी येथे कर्तव्य बजावत आहे.
अनेकदा सेवा बजावताना डॉक्टरांच्या अनुपस्थितीत आम्हालाच डॉक्टर व्हावे लागते. एकदा सेवेवर असताना कान दुखतोय म्हणून एक पेशंट आला. डॉक्टरांनी तपासून त्याला इंजेक्शन द्यायचे सांगितले. मी इंजेक्शन दिले पण त्याची तगमग थांबत नव्हती. शेवटी अनुभवातून मी त्याचा कान पुन्हा बारकाईने तपासला असता त्यात गोम असल्याचे मला दिसले. क्षणाचा विलंब न करता ती गोम मी व माझ्या सहकारी नर्सने मिळून काढली. त्यानंतर पेशंटच्या चेहऱ्यावर दिसलेले हास्य मी विसरू शकत नाही.
२४ वर्षांच्या सेवेत अनेक अत्यवस्थ पेशंट बघून उद्विग्न झाले. रडत आलेला पेशंट जेव्हा बरा होऊन हसत रूग्णालयाबाहेर पडतो तेव्हा खूप समाधान वाटते. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद समोर ठेवून रुग्ण सेवा केल्यास मिळणारे समाधान अन्य कोणत्याच सेवेत नाही. सण असो की उत्सव आम्ही रुग्णालयात सेवा देत असतो. आलेल्या पेशंटची सेवा हीच आमची दिवाळी, ईद आणि नाताळ असतो.
विविध रुग्णालयांमध्ये परिचारिकेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. वैद्यकीय सेवेमध्ये परिचारिका होण्यासाठी फारसे कोणी उत्सुक नसते. परंतु अंजुनिका घोरपडे यांनी मावशीकडे गेल्यानंतर तेथील रुग्णसेवेचे महत्त्व जाणून घेतले आणि परिचारिका होण्याचा मनोमन निर्णय केला.
केवळ निर्णय करूनच घोरपडे थांबल्या नाही तर त्यांनी त्या दृष्टीने पावले टाकत नर्सिंगचा अभ्यास करत शासकीय सेवेत रुजूही झाल्या. आज ज्या प्रमाणे अद्ययावत संपर्क यंत्रणा आहे, ती पूर्वी नव्हती. त्यामुळे ओपीडीमध्ये असताना अनेकवेळा दूरध्वनी खणखणत असत, परंतु हातात सलाईनची सुई आणि रुग्णांची होणारी तळमळ लक्षात घेता तो फोनही घेता येत नसे.
आज परिस्थिती बदलली आहे. कुठल्याही दुर्गम भागात अपघात अथवा एखाद्या आजाराची साथ पसरल्यास त्याची माहिती तातडीने मिळते. माहिती मिळत असल्याने त्यावर नेमके काय केले पाहिजे, याचे उत्तरही मिळत असल्याने रुग्ण आणि रुग्णालयातील अंतर आपोआपच कमी झाले असल्याचे घोरपडे म्हणाल्या.
अनेक रुग्णांच्या मदतीसाठी गेल्याचे मनोमन समाधान
कुठलाही रुग्ण हा त्याला आजार झाल्यानंतर तो प्रथम त्या त्रासातून मुक्त कसा होईल, याचा विचार करतो, रुग्णालयात आल्यानंतर त्याला होणा-या वेदना कुठल्याही परिस्थितीत कमी कशा होतील, या विचारात तो असतो.
औषधांपेक्षा कधीकधी संबंधित रुग्णाला दिलासा देणे हे देखील महत्त्वाचे काम असते. कितीही गंभीर अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या रुग्णाला तुम्हाला काहीही झाले नाही. तुमचे दुखणे किरकोळ आहे, असे सांगितल्यावर गंभीर असलेला रुग्ण मनाने खंबीर बनून उपचाराला साथ देतो. डॉक्टर आल्यानंतर तर त्या रुग्णाच्या चेह-यावर एक वेगळेच समाधान आपण पाहिले आहे.

Web Title: The dream of becoming a nurse for patient care is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.