स्वप्न उद्याचे..स्वच्छ नद्यांचे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:15 AM2020-02-16T00:15:24+5:302020-02-16T00:15:55+5:30
शनिवारी सकाळी कुंडलिका नदीपात्रात रामतीर्थ बंधा-या जवळ कुंडलिका आणि सीना नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ज्या ठिकाणाहून नदी वाहते, तेथेच मानवी वस्ती वसलेली आहे. जालन्यात कुंडलिका आणि सीना नदीचा संगम होत असून, येथे जालनेकरांचे वास्तव्य आहे. परंतु गेल्या काही वर्षात या नद्यांना गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे सर्व मानवी चुकांमुळे झाले असून, सांडपाणी तसेच कचऱ्यांचे ढीग नदीत टाकून त्या प्रदूषित करण्यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत. आता वेळ आली आहे, की, नद्यांमधील कचरा हटवून त्या स्वच्छ करण्याची. त्यासाठी जालन्यातील ४५ स्वयंसेवी संस्था, जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन सरसावले आहे. आगामी काळात नदी स्वच्छ करून जालन्याच्या सौंदर्यात भर घालण्याच्या या विशेष नदी स्वच्छता अभियानात सर्वांनी आपला हातभार लावल्यास हे शक्य होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.
शनिवारी सकाळी कुंडलिका नदीपात्रात रामतीर्थ बंधा-या जवळ कुंडलिका आणि सीना नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राजेश राऊत, माजी मंत्री अर्जुन खोतकर, बबलू चौधरी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, सामाजिक कार्यकर्ते तथा समस्त महाजन स्ट्रस्टच्या नूतन देसाई, सुनील रायठठ्ठा, शिवरतन मुंदडा, रमेशभाई पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर, अभियंता एस. एन. कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विधीवत पूजन करण्यात आले.
नदी किनाऱ्यांवर वृक्षारोपण करणार : संगीता गोरंट्याल
जालन्यातील कुंडलिका आणि सीना नदीच्या स्वच्छता मोहिमेचे आपण स्वागत करतो. त्यासाठी जालना पालिका देखील पूर्ण सहकार्य करेल. चौदाव्या वित्त आयोगातून या दोन्ही नद्यांच्या किना-यावर डेन्सटी फॉरेस्ट योजनेतून वृक्ष लागवड केली जाणार आहे. पुण्यातील धर्तीवर जालन्यातील या दोन्ही नदी परिसरात पादचा-यांना चालण्यासाठी ट्रॅकची व्यवस्था करणार आहोत. या स्वच्छता मोहिमेत जालना नगर पालिका देखील सिंहाचा वाटा उचलून जालना शहर हे स्वच्छ आणि सुंदर करणार आहोत. यापूर्वीच आम्ही शहरात घंटा गाड्या सुरू करून स्वच्छतेला प्रारंभ केला आहे. त्याचे चांगले परिणामही दिसत आहेत, असे असले तरी त्यात सर्वांची साथ हवी आहे.
दोन घाट बांधण्याचे नियोजन : कैलास गोरंट्याल
कुंडलिका आणि सीना नदी स्वच्छता मोहिमेस आपला पूर्ण पाठिंबा आहे. स्वयंसेवी संस्थांनी ज्याप्रमाणे पुढाकार घेतला आहे, त्याला आमची संपूर्ण साथ राहणार आहे. रामतीर्थ स्मशानभूमी तसेच पंचमुखी महादेव मंदिर पसिरात नागरिकांच्या हितासाठी दोन घाट बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एक ते सव्वा कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान या स्वयंसेवी संस्थांच्या अभियानात आमदार म्हणून आपले पूर्वीप्रमाणे संपूर्ण सहकार्य राहणार आहे. पालिका प्रशासनही त्यासाठी हवे ते सहकार्य करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करू.
महाजन ट्रस्टचे सहकार्य राहणार : नूतन देसाई
जालन्यातील पाणी टंचाई असो की, अन्य कुठलीही नैसर्गिक आपत्ती असेल तर महाजन ट्रस्टने नेहमीच सहकार्य केले आहे. या नदी स्वच्छता मोहिमेतही आमचा पूर्ण सहभाग राहणार आहे. त्यासाठी आम्ही डिझेल तसेच जेसीबीचा खर्च देणार आहोत. या ट्रस्टने जालना जिल्ह्यात गेल्या चार वर्षात जलसंधारणाची जवळपास ३०० पेक्षा अधिक कामे यशस्वी केली आहेत. गुजरातमध्ये ज्या प्रमाणे नद्यांचे संवर्धन आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आम्ही जालन्यात आता कुंडलिका आणि सीना नदीसाठी तसेच प्रयत्न करू.
ही चळवळ काळाची गरज : अर्जुन खोतकर
शहरातील उद्योजक, सामाजिक संघटनांनी यापूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वी केला. तसेच कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे बंधा-यावर सव्वा कोटी रूपये खर्च केले. त्यांचे चांगले परिणाम आज दिसत आहेत. या परिसरातील नागरिकांना आता कधीच पाणी टंचाई जाणवत नसल्याचे अनुभव अनेकांनी सांगितले आहेत. कुंडलिका, सीना नदीच्या स्वच्छतेसाठी आज जी मोहीम हाती घेतली आहे, त्यातून मोठा कायाकल्प या नद्यांचा होणार आहे. त्यासाठी माझे सर्व सहकार्य राहणार आहे. एकूणच या नदीच्या उपक्रमात जी महाजन ट्रस्ट मदत करत आहे. त्याची माहिती आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली असून, एक नामांकित स्वयसेंवी संस्था म्हणून यांची ओळख असल्याची माहितीही ठाकरे यांना दिल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले.