बस थांबविण्यावरून चालक- प्रवासी महिलेमध्ये तासभर शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:42 AM2019-12-02T00:42:26+5:302019-12-02T00:42:44+5:30
शहागड येथे बस थांबविण्याच्या कारणावरून प्रवासी व चालकात रविवारी दुपारी शाब्दिक चकमक झाली. वाद इतका विकोपाला गेला होता की चालकाने बस चक्क पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेली
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : शहागड येथे बस थांबविण्याच्या कारणावरून प्रवासी व चालकात रविवारी दुपारी शाब्दिक चकमक झाली. वाद इतका विकोपाला गेला होता की चालकाने बस चक्क पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेली होती. मात्र, नंतर वाद मिटल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली नाही.
शहागड बसस्थानकासमोर सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोड पासून दहा मीटरवर बसस्थानक आहे. तरीही बसस्थानकात बस घेण्यासाठी चालक- वाहक टाळाटाळ करतात. बस दहा मिटरवर थांबत असल्याने बसस्थानकात बसलेल्या प्रवाशांना पळत येऊन बस गाठावी लागते. असाच प्रकार रविवारी दुपारी घडला. लातूर- जळगाव बस (क्र. एम.एच.२०- बी.एल. ३४२९) बसस्थानकात घेणे- बाहेर थांबण्या वरून चालक व प्रवाशी महिलेमध्ये शाब्दीक चकमक झाली. महिला व चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे प्रकरण वाढले. तद्नंतर चालक व त्या महिलेने बस शहागड पोलीस चौकीतच घेऊन जाण्याचा जोर धरला. तद्नंतर बस पैठण रोड मार्गे शहागड पोलीस चौकीच्या दिशेने गेली. बस चौकीत पोहोचण्याआगोदर नागरिकांनी चौकी परिसरात गर्दी केली. बस चौकीच्या गेट पर्यंत येऊन थांबली. बस मधील लांब पल्ल्यावरील प्रवाशांनी बस चौकीत नेऊन कशाला वाद वाढविता असे सांगत दोघांची समजूत काढली. जवळपास तासभर चाललेला हा वाद पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर मिटला. त्यानंतर बस पुढील मार्गावर मार्गस्थ झाली.