चालकाला डुलकी लागल्याने मजुरांची जीप उलटली; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 03:30 PM2019-11-15T15:30:08+5:302019-11-15T15:32:51+5:30
हा अपघात शुक्रवारी सकाळी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोडडगाव फाट्याजवळ घडला.
वडीगोद्री (जालना) : मध्यप्रदेशातील मजुरांना गेवराई येथे घेऊन जाणारी मालवाहतूक जीप उलटली झाली. या अपातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, २२ मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. यात महिला, पुरूषांचाही समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोडडगाव फाट्याजवळ घडला.
मध्यप्रदेशातील ३० मजुरांना गेवराई येथील बाहुबली जिनिंग येथे कामासाठी एका वाहनातून (क्र.एम.पी.१०- जी. ११८२) नेण्यात येत होते. हे वाहन औरंगाबाद - सोलापूर महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ (ता.अंबड) शुक्रवारी सकाळी आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाले. तीन पलट्या मारलेले वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले. या भीषण अपघातात वाहनातील २५ मजूर जखमी झाले. पैकी तिघे गंभीर तर २२ जणांना किरकोळ दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रूग्णवाहिकेतून व इतर वाहनातून जखमींना पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिनेश छतरसिंग सोलनकी (२६ रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी मध्य प्रदेश) या मजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर संगीता सोलंकी (१५ रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी), पप्पू रमेश चव्हाण (२० रा. आमसरी ता. भगवानपुरा, जि.खरगोन), गणेश काकडी जमरे (२१ रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी), तुकाराम ब्राहमने (१२ रा. आमसरी, ता.भगवानपुरा, जि.खरगोन), बिला गणेश जमरे (१८ रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी),संगीता भुवरे (१८) स्नेहल, शितल यादव (२२), वर्षा सोलनकी (२०), मंजू कांतीलाल दुवे (२०), रेवती हिरालाल सोलंकी (२४), घोडेलाल जलसिंग भुवरे (२४ सर्व रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी मध्यप्रदेश) हे मजूर या अपघातात जखमी झाले.
झोपेने केला घात
चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाला त्यावेळी वाहनातील अनेक मजूरही झोपेत होते. चालकाला झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाल्याचे काही मजुरांनी सांगितले. अपघातादरम्यान अनेक महिला, युवक मजूरही झोपेत होते. त्यामुळे अचानक झालेल्या अपघातानंतर ते घाबरले होते. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.